नागपूर(इंडिया दर्पण वृत्तसेवा)– वाडीचा विकास गेल्या पाच दशकांपासून जवळून बघतोय. आज वाडीचे चित्र बदलले आहे, याचा आनंद आहे. एकेकाळी या रस्त्याने जाणे अवघड होते. रस्ता खराब होताच, पण ट्रक उभे राहायचे. गोडाऊन्स होते. अपघात व्हायचे. मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना लोकांना करावा लागत होता. आज या उड्डाणपुलामुळे अमरावती महामार्गावरील वाहतूक कोंडी दूर होणार आहे, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवार व्यक्त केला.
वाडी येथील चारपदरी उड्डाणपुलाचे आणि व्हेरायटी चौक ते बोले पेट्रोल पंप चौक व विद्यापिठ चौक ते वाडी नाका चौक दरम्यान ४.८९ किलोमीटरच्या व्हाईट टॉपिंगचेही लोकार्पणगडकरी यांच्या हस्ते झाले. तसेच १०५ कोटी रुपये खर्चाच्या भुयारी गटार योजनेचे भूमिपूजनही यावेळी झाले. या कार्यक्रमाला आमदार टेकचंद सावरकर, आमदार समीर मेघे, आमदार डॉ. परिणय फुके, भाजपचे जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे, माजी आमदार सुधाकर देशमुख, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये यांची प्रमुख उपस्थिती होती. नागपूर-अमरावती महामार्गावर २.३ किलोमीटरचा चारपदरी उड्डाणपूल लोकांच्या सेवेत अर्पण करण्यात आला आहे. या प्रकल्पाची किंमत २४६ कोटी रुपये आहे. रविनगर येथून सुरू होणाऱ्या उड्डाणपुलाचे कामही लवकरच पूर्णत्वास येणार आहे.
ना. श्री. गडकरी म्हणाले, ‘उड्डाणपूल उत्तम दर्जाचा झाला आहे. दोन ते तीन मिनिटांत शहरात जाता येणार आहे. रवीनगरचा उड्डाणपूल झाल्यावर थेट व्हेरायटी चौकात पोहोचता येणार आहे. शहरातून बाहेर निघण्यासाठी फार तर १५ मिनिटे लागणार आहेत.’
वाडीपासून जवळच अॅग्रोकन्व्हेन्शन सेंटर तयार होत आहे. जागतिक स्तरावरील प्रदर्शने इथे होणार आहेत. नागपूर शहर, जिल्हा आणि वाडी परिसरातील हजारो तरुणांना रोजगार मिळणार आहे. जवळच साडेचारशे खोल्यांचे थ्री स्टार हॉटेलही आणि सहा रेस्टॉरंटस् होणार आहेत, असेही गडकरी म्हणाले. वाडीचा चौफेर विकास होत असताना १८ मिटर आणि २४ मिटरची ट्रॉली बस येथून सुरू होणार आहे. नागपूरच्या ५० किलोमीटरच्या रिंगरोडवर ही बस धावणार आहे. देशातील पहिला प्रयोग वाडीमध्ये होणार आहे. या बसचे तिकीट डिझेल बसच्या तुलनेत कमी राहणार आहे, अशी माहिती गडकरी यांनी दिली.