नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- माजी केंद्रीय मंत्री, अर्थतज्ज्ञ चिंतामणराव देशमुख यांच्या नावाने सरहद, पुणे संस्थेच्या वतीने दिला जाणारा ‘चिंतामणराव देशमुख राष्ट्रीय पुरस्कार २०२५’ हा पुरस्कार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी केंद्र सरकारमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केलेल्या केंद्रीय मंत्र्यांच्या कार्यावर प्रकाश टाकणारं धनंजय बिजले लिखित ‘महामुद्रा’ पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आले. महामुद्रा पुस्तकात देशात केंद्र सरकारमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केलेल्या केंद्रीय मंत्र्यांच्या कार्यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. हे पुस्तक महाराष्ट्रातील येणाऱ्या पिढीसाठी मार्गदर्शक ठरेल असा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
यावेळी शरद पवार म्हणाले की, या पुरस्काराचे मानकरी मला आनंद आहे की, नितीन गडकरी हे झालेले आहेत. आज पार्लमेंटमध्ये आम्हालाही खासदार लोक भेटतात. त्यातले निदान ७०% खासदार मला सांगत असतात, “गडकरींशी मीटिंग आहे, आमच्या तालुक्यातला हा रस्ता, आमच्या मतदारसंघातला हा रस्ता” सबंध खासदारांना त्यांच्यावर प्रचंड विश्वास आहे. कर्तुत्वाने कामाने आणि स्वभावाने ही स्थिती त्यांनी कमावलेली आहे. त्यामुळे सी. डी. देशमुख यांचा जो नावलौकिक होता त्यांना साजेल असं या ठिकाणी व्यक्तीची निवड करायची झाली तर गडकरींइतकं उंचीची दुसरी व्यक्ती आज आम्हाला दिसत नाही. म्हणून मी आज सरहद आणि त्यांच्या सहकाऱ्यांना धन्यवाद देतो की, त्यांनी त्यांची योग्य प्रकारे निवड केली. पवार पुढे म्हणाले की, अनेक वर्षांपासून आम्ही एकमेकांना बघत आहोत. ते महाराष्ट्राच्या विधिमंडळात होते, मी त्यावेळेला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो. अनेक प्रश्नांसंबंधी चर्चा होत असे. राज्याच्या हिताच्या दृष्टीने महत्त्वाच्या धोरणाचा विषय निघाल्यानंतर त्याचा सखोल अभ्यास करणारा एकमेव प्रतिनिधी म्हणून नितीन गडकरी यांचा विधिमंडळात उल्लेख व्हायचा. नंतर ते दिल्लीमध्ये आले. आज या दिल्लीमध्ये त्यांचा एक दबदबा आहे, त्यांच्या कामामुळे.
दुसरं महायुद्ध झालं त्यावेळेला जर्मनी सारखा देश हा आर्थिक दृष्ट्या अतिशय संकटात आला. मग जर्मनीने काही धोरणात्मक निर्णय घेतले. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा निर्णय ‘Autobahn’ याचा अर्थ अतिशय प्रभावी दळणवळणाची साधनं. सबंध जर्मनीमध्ये दळणवळणाची साधनं तिथल्या राज्यकर्त्यांनी उभी केली. त्याचा परिणाम आज युरोपमध्ये एक अत्यंत यशस्वी आणि प्रगतिशील देश म्हणून आज त्या ठिकाणी त्यांचा उल्लेख केला जातो. नेमकं तेच काम गडकरी यांनी केलं. आज देशाच्या कानाकोपऱ्यात प्रचंड रस्ते याच्यात बदल झालेले आहेत. त्या प्रत्येक रस्त्यांच्या कामाचे योगदान हे विचारल्यानंतर लोक कटाक्षाने गडकरी यांचं नाव घेतात. काही लोकांचा समज असेल की, फक्त महाराष्ट्र पुरतं त्यांचं काम आहे. पण हे खरं नाही. आपण अगदी कश्मीरपासून खाली आलो आणि केरळ पर्यंत गेलो त्या सगळ्या प्रांतांमध्ये अतिशय महत्त्वाचं ज्यांनी काम करून ठेवलं. त्याचं नाव आज देशाच्या प्रत्येक कामामध्ये जोडलं. देशाला एकत्रित जोडण्याचं काम हे त्यांनी खऱ्या अर्थाने केलं. स्वच्छ कारभार आणि थोडं अधिक स्पष्ट बोलण्याचा स्वभाव. त्याचा परिणाम अधिकाऱ्यांवर होत असतो. तुम्हाला माहीत नसेल पण लोक आम्हाला येऊन सांगत असतात. या सर्व प्रकल्पांमध्ये उत्तम काम केलं. हे गडकरींच्या नजरेत आलं तर त्यांचं कौतुक होतं. त्या कामाचा दर्जा ठीक नसल्यानंतर त्यांच्या तोंडातून येतं याच्यात दुरुस्ती झाली नाही तर माझ्या हातात काय आहे? हे लक्षात घ्या. तुमची सुटका होणार नाही. त्यातला चेष्टेचा भाग हा सोडून द्या. पण या सगळ्या क्षेत्रांमध्ये त्यांनी मोठं काम केलं. त्यांचं वैशिष्ट्य हे आहे की, आज ५०० पेक्षा अधिक खासदार विविध पक्षांचे पार्लमेंटमध्ये आहेत. राज्यसभेत २०० आहेत. कुठल्याही खासदाराला तुम्ही प्रश्न विचारला गडकरींच्या कामाबद्दल तो प्रत्येकजण अतिशय समाधानाने त्यांचं वर्णन करतो. कोणी असं सांगत नाही की, हा काँग्रेसचा आहे, हा अमुक पक्षाचा आहे, हा त्या पक्षाचा आहे. असा दृष्टिकोन गडकरी यांनी कधीही घेतला नाही. त्यांचा दृष्टिकोन एकच की, हा देश आर्थिक दृष्ट्या संपन्न झाला पाहिजे. त्यामध्ये दळणवळणाची साधनं ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. म्हणून त्यामध्ये आज प्रचंड काम त्यांनी करून ठेवलेलं आहे.