नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यक्रमात रविवारी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. गडकरी यांनी आलेली निवेदने थेट संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांच्या हाती सोपवत समस्या सोडविण्याचे निर्देश दिलेत. बहुतांश प्रकरणात वेळीच निकाल लावण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
खामला येथील जनसंपर्क कार्यालयात गडकरी यांना विविध समस्या, अडचणी तसेच मागण्यांशी संबंधित निवेदने लोकांनी दिली. यातील बहुतांश विषय नागपूर महानगरपालिका, नागपूर सुधार प्रन्यास, जिल्हाधिकारी कार्यालय आदींशी संबंधित होते. यंदाच्या जनसंपर्क कार्यक्रमाला या सर्व कार्यालयांशी संबंधित प्रतिनिधींना हजर राहण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार नगर भूमापन अधिकारी, उपजिल्हाधिकारी (सेतू), समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, भूमि अभिलेख, महानगरपालिका, नासुप्र, सीआरसी सेंटर येथील अधिकारी उपस्थित होते.
लोकांनी दिलेल्या निवेदनांवर ना. श्री. गडकरी यांनी चर्चा करून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यावर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. काही प्रकरणांमध्ये थेट फोनवरून संपर्क साधत प्रश्नांचे ‘ऑन दि स्पॉट’ निराकरण करण्यात आले. नागरी सुविधांच्या संदर्भातील मागण्या, शासकीय योजना आदी विषयांशी संबंधित निवेदने नागरिकांनी दिलीत.
यावेळी विविध क्रीडा प्रकारांत उत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचे गडकरी यांनी कौतुक केले. तर काही तरुणांचे विविध क्षेत्रांशी संबंधित इनोव्हेटिव प्रयोग देखील गडकरी यांनी समजून घेतले.
कर्करोग पीडित महिलेने व्यक्त केली कृतज्ञता
कर्करोगाच्या उपचारासाठी सहकार्य केल्याबद्दल एका महिलेने गडकरी यांचे आभार मानले. ‘मी गेल्या काही वर्षांपासून कर्करोगासारख्या दुर्धर आजाराने ग्रस्त आहे. माझ्या कुटुंबाची आर्थिक स्थिती खलावली आहे. माझ्या उपचाराकरिता लागणारे औषध अंत्यत महाग आहे. आपल्याला संपर्क साधला असता तातडीने मदत मिळाली. त्याबद्दल मनःपूर्वक आभारी आहे,’ या शब्दांत महिलेने पत्राद्वारे कृतज्ञता व्यक्त केली.