इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात बोलतांना सांगितले की, कधीही तिसरे महायुद्ध होण्याची शक्यता आहे. जगभरात संघर्षाचे वातावरण आहे. इराण आणि इस्रायल यांच्यात युद्ध सुरू आहे. रशिया आणि युक्रेनमधील वाद पूर्णपणे संपलेला नाही. त्यामुळे या युद्धांच्या पार्श्वभूमीवर कधीही तिसरे महायुद्ध होण्याची शक्यता आहे.
यावेळी गडकरी पुढे म्हणाले की, युद्धाच्या वाढत्या तंत्रज्ञानामुळे, युद्धाचे परिमाण बदलले आहेत आणि युद्धात क्षेपणास्त्रे आणि ड्रोनचा वापर वाढला आहे, ज्यामुळे टँक आणि इतर प्रकारच्या विमानांची प्रासंगिकता कमी होत आहे. या सर्वांमध्ये, मानवतेचे रक्षण करणे कठीण झाले आहे.
नागरी वस्त्यांवर अनेकदा क्षेपणास्त्रे डागली जातात. यामुळे एक गंभीर समस्या निर्माण झाली आहे आणि या सर्व मुद्द्यांवर जागतिक स्तरावर चर्चा होणे आवश्यक आहे. असे म्हणणे योग्य ठरणार नाही, परंतु हा मार्ग हळूहळू विनाशाकडे जात आहे, असे गडकरी यांनी सांगत जगभरातील गंभीर विषयांकडे लक्ष वेधले. यावेळी त्यांनी युद्धांच्या गर्तेत जगाला अहिंसेचा मंत्र देण्याची गरज आहे. असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी केले.
मिहीर भागवत या १६ वर्षांच्या तरुणाने लिहिलेल्या ‘बियाँड बॉर्डर्स’ या इंग्रजी पुस्तकाचे गडकरी यांच्या हस्ते प्रकाशन झाले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला ज्येष्ठ कृषीतज्ज्ञ डॉ. सी. डी. मायी, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. जागतिक विषयावर अभ्यास करून अतिशय उत्तम पुस्तक लिहिल्याबद्दल गडकरी यांनी मिहीरचे कौतुक केले.
गडकरी म्हणाले, ‘आज जगात संघर्षाचे वातावरण आहे. इराण आणि इस्रायल यांच्यात युद्ध सुरू आहे. रशिया आणि युक्रेनमधील वाद पूर्णपणे संपलेला नाही. यामध्ये मानवतावादी दृष्टीकोन बाळगणे अधिक महत्त्वाचे आहे. अहिंसा प्रस्थापित होणे गरजेचे आहे. मिहीरने लहान वयात अध्ययन करून त्याचे चिंतन या पुस्तकात मांडले आहे. त्याबद्दल त्याचे विशेष कौतुक. यावेळी मिहीरचे पालक, नातेवाईक तसेच मित्रमंडळी उपस्थित होते.