नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांमुळे काम झाल्यानंतर नागरिकांनी आज त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली. रविवार, ९ मार्चला आयोजित जनसंपर्क कार्यक्रमात अनेकांनी त्यांचे आभार मानले.
गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यक्रमाला नागरिकांनी चांगलीच गर्दी केली होती. व्यक्तिगत तसेच संस्थांच्या पातळीवरील मागण्यांची निवेदने गडकरी यांना सोपविण्यात आली. गडकरी यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना संबंधित विषयावर कार्यवाही करण्याच्याही सूचना दिल्या.
विशेष म्हणजे गडकरी यांच्या सहकार्याने हृदयशस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांनीही भेट घेतली. त्यांनी गडकरी यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यामध्ये काहींवर शस्त्रक्रिया झालेल्या आहेत. तर काहींच्या अँजिओप्लास्टी झाल्या आहेत. यापैकी अनेकांवर कुटुंबाची जबाबदारी आहे. त्यामुळे गडकरी यांचे आभार मानताना रुग्णांचे डोळे पाणावले होते. मंत्री महोदयांच्या प्रयत्नांमुळे काही दिव्यांगांना देखील वैयक्तिक मदत झाली. त्यांनीही आज गडकरी यांची भेट घेतली व आभार मानले.
नागपुरातील एका आयआयटीच्या विद्यार्थ्याने देखील गडकरी यांच्याकडे आपली व्यथा मांडली. शारीरिक व्यंगामुळे नोकरी मिळण्यास अडचण येत असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर गडकरी यांनी त्या तरुणाची शिफारस योग्य ठिकाणी करण्याच्या सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.
काही दिव्यांगांनी नोकरीसाठी तर काहींनी कृत्रिम हात व पायांच्या मागणीसाठी निवेदन दिले. नवीन रस्त्यांसाठी, अनुकंपा तत्त्वावरील नोकऱ्यांसाठी, आरोग्य क्षेत्रातील मागण्यांसाठी नागरिकांनी निवेदने दिली. यावेळी गडकरी यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. व्यक्तिगत पातळीवरील प्रश्नांसह संस्था-संघटना, शहराच्या व खेड्यापाड्यांमधील विषयांवर नागरिकांनी गडकरी यांच्यासोबत चर्चा केली.
विविध मागण्यांची निवेदने स्वीकारून मंत्री महोदयांनी संबंधित विभागांकडे या संदर्भात पाठपुरावा करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. यासोबतच रेल्वे, महामार्ग, कृषी, सहकार, पर्यावरण, पाणीपुरवठा, ऑटोमोबाईल अशा विविध क्षेत्र व विभागांशी संबंधित विषय गडकरी यांनी ऐकून घेतले.