इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
लातूरः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान कोणालाही बदलता येणार नाही अथवा आम्ही बदलू देणार नाही, असा ठाम विश्वास केंद्रीय रस्ते बांधणी मंत्री नितीन गडकर यांनी व्यक्त केला. काँग्रेसनेच अनेक वेळा संविधान बदलण्याचा प्रयत्न केला, म्हणून काँग्रेसचा प्रचार म्हणजे उलट्या बोंबा याप्रमाणे आहे. लोकसभा निवडणुकीत आम्ही केलेल्या विकासाचा प्रतिवाद करता येत नाही, म्हणून काँग्रेसने जनतेत संभ्रम निर्माण केला, अशी टीका केंद्रीय रस्तेबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी केली.
महायुतीचे उमेदवार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर माजी खासदार रूपाताई पाटील निलंगेकर, डॉ. सुनील गायकवाड, आमदार शरणू सलगर, माजी आमदार गोविंद केंद्रे, प्रकाश खंड्रे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सूरज चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप देशमुख, अरविंद पाटील निलंगेकर आदी या वेळी उपस्थित होते.
गडकरी म्हणाले, की काँग्रेस पक्षानेच भारतीय संविधानाचा बोजवारा उडवला असून अनेक वेळा घटना बदलण्याचे काम त्यांनी केले. सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्च पीठाने घटनेच्या मूलतत्त्वाला कोणीही हात लावू शकत नाही असा निर्णय दिला आहे. त्यामुळे घटना बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असा पुनरुचार त्यांनी या वेळी केला. शिवाय काँग्रेसच्या चुकीच्या धोरणामुळे साठ वर्षात काँग्रेस देशाचा विकास करू शकली नाही. हे जनतेसमोर असून आम्ही काय दहा वर्षात विकास केला हे पण जनतेसमोर आहे. त्यामुळेच तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. भारत हा जगातील तिसरी शक्तिशाली आर्थिक देश बनणार असून, येत्या काळात मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ हा आमचा नारा असून संपूर्ण भारतभर रस्त्याची जाळे पसरले आहे. येत्या काळात उर्वरित रस्त्याचे कामे केली जाणार आहेत. देशातला शेतकरी अन्नदाता नव्हे तर ऊर्जादाता, इंधन दाता झाला पाहिजे हे धोरण भारतीय जनता पक्षाचे आहे.