नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- प्रतिभाशाली आणि लोकप्रिय होण्यासाठी काय करावे लागेल, याचा विचार करण्याची गरज आहे. कारण रंगभूमीला, नाटकांना लोकाश्रय मिळाला तरच नाटक आणि कलावंत पुढे जाईल. त्यासाठी रंजन कला मंदिरासारख्या संस्थांकडून प्रबोधन आणि प्रशिक्षण खूप आवश्यक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज (रविवार) येथे केले.
रंजन कला मंदिराच्या अमृत महोत्सवी वर्षाचे उद्घाटन ना. श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध अभिनेते उपेंद्र दाते अध्यक्षस्थानी होते. तर सुप्रसिद्ध अभिनेत्री जान्हवी प्रभाकर पणशीकर, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या केंद्रीय शाखेचे उपाध्यक्ष नरेश गडेकर, अॅड. रमण सेनाड, संजय पेंडसे यांची प्रमुख उपस्थिती होती. सीताबर्डी येथील भिडे कन्या शाळेच्या म. बा. कुंडले सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
गडकरी म्हणाले, ‘कलावंत आणि कलाकृतीमध्ये क्षमता असेल तर लोकाश्रय मिळतोच, हे प्रभाकर पणशीकर आणि दारव्हेकर मास्तर यांच्यासारख्या कलावंतांनी सिद्ध केले आहे. यातून नाट्य संस्था टिकतील आणि नाट्य चळवळ देखील टिकेल. मी नाटक मागून आणि सनेमा पुढून बघणाऱ्यांपैकी होतो. प्रभाकर पणशीकर आणि दारव्हेकर मास्तर यांच्या स्मृती कधीही मिटू शकत नाहीत. तो मी नव्हेच, इथे ओशाळला मृत्यू, कट्यार काळजात घुसली यासारखी दर्जेदार नाटकं या दोघांनी दिली. ती आजही स्मरणात आहेत. हेच त्यांचे यश आहे.’ ‘ती फुलराणी’ हे नाटक बघण्यासाठी धनवटे रंग मंदिरात अटलजींना घेऊन आलो होतो आणि त्यांना नाटक खूप आवडलं, याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.
मराठी नाटक, सिनेमा, कविता या सर्वांच्या बाबतीत देशात महाराष्ट्राची तुलना फक्त बंगालसोबत होऊ शकते, असेही ते म्हणाले. ‘जे कलावंत समर्पण देऊन काम करतात, त्यांचा आर्थिक पाया कमजोर असतो. मग अशा संस्था लोप पावतात. त्यामुळे लोकाश्रय आवश्यक आहे. जीव ओतून काम करणारी व्यक्ती स्वतःचा विचार करत नाही. कारण त्याला कलेची नशा असते. म्हणून मी कायम सर्वांना म्हणतो की तिकीट काढूनच नाटक बघा. कलावंतांच्या परिश्रमाचा आनंद फुकटात घेणे चांगले नाही. त्यामुळे मी सुद्धा तिकीट काढूनच नाटक बघतो,’ असेही ना. श्री. गडकरी म्हणाले.
कलावंत साहित्यिकांना सन्मानाने आयुष्यभर कसं जगता येईल, याचा विचार करायला हवा. तरच चळवळ टिकेल. आज दारव्हेकर मास्तर नाहीत, मनोहर म्हैसाळकर नाहीत. म्हैसाळकर साहित्य संघाचे आधारस्तंभ होते. त्यांनी अनेक वर्षे साहित्य संघ सांभाळला. आता नवीन लिडरशीप तयार झाली पाहिजे. नव्या प्रतिभेची माणसं तयार होणं गरजेचं आहे. मोठ्या लेखकांनी, दिग्दर्शकांनी, नव्या प्रतिभांच्या मागे उभं राहिलं पाहिजे. ओनरशिप घेऊन काम करणारे लोक तयार होणे गरजेचे आहे, अशी अपेक्षाही ना. श्री. गडकरी यांनी व्यक्त केली.
कर्नाटकात ‘तो मी नव्हेच’ची आठवण
पंधरा दिवसांपूर्वी मी कर्नाटकमध्ये निपाणी गावात गेलो होतो. तिथे डॉ. प्रभाकर कोरे यांच्या मोठ्या संस्था आहेत. डॉ. कोरे यांचा सत्कार होता. ५० हजार लोक उपस्थित होते. मी बोलायला उभा झालो, तेव्हा काही लोक म्हणाले, मराठीत बोला. काही म्हणाले हिंदी किंवा इंग्रजीत बोला. मी गमतीने सुरुवात केली की निपाणीचं नाव प्रभाकर पणशीकर यांच्या तोंडून वारंवार ऐकलं आहे. ‘तो मी नव्हेच’ या नाटकात ते प्रत्येक प्रसंगात शेवटी ‘मी तर निपाणीचा तंबाकुचा व्यापारी…’ असं म्हणाले. मी ते आजही विसरलेलो नाही, अशी आठवण गडकरी यांनी सांगितली.
‘शतकातील सर्वांत मोठे योगदान दारव्हेकर मास्तरांचे’
मी शिकलो त्या डी.डी. नगर शाळेत पुरुषोत्तम दारव्हेकर शिक्षक होते. शताब्दी वर्ष असताना १९६९ मध्ये शिक्षकांनी ‘देव नाही देव्हाऱ्यात’ हे नाटक बसवले. मास्तरांचे दिग्दर्शन होते. दारव्हेकर मास्तरांबद्दल नागपूरला खूप अभिमान आहे. या शतकात मराठी नाटकाच्या क्षेत्रात ज्यांनी सर्वांत मोठं योगदान दिले असे ज्येष्ठ-श्रेष्ठ कुणी असतील तर ते दारव्हेकर मास्तर होते. त्यामुळे रंजन कला मंदिराच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने मला त्यांना आदरांजली अर्पण करता आली, हे माझे भाग्य समजतो, अशी भावनाही ना. श्री. गडकरी यांनी व्यक्त केली. नागपूरच्या भूमिपुत्राने मराठी नाट्यसृष्टीत खूप मोठं नाव निर्माण केलं. त्यांनी अनेक कलावंत निर्माण केले, याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.