नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- या वर्षाच्या अखेरपर्यंत लॉजिस्टिक खर्चाची टक्केवारी कमी होऊन ती दहा टक्क्यांच्या आत असेल. रस्ता सुरक्षा सर्वात महत्त्वाची आहे. त्यामुळे अपघात रोखण्यासाठी जनजागृती व लोकांचे वाहतुकीबाबतचे आचरण सुधारण्यासाठी सामाजिक संस्थांचा सहभाग गरजेचा आहे. रस्ते अपघातातील जखमींना मदत करणाऱ्या व्यक्तींना ‘राह वीर’ म्हणून २५ हजार रुपयांचे बक्षीस दिले जाईल तसेच जखमींना १.५ लाख रुपयांपर्यंत विमा प्रदान केला जाईल असी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
भारतीय वाहन उत्पादक संघाच्या (SIAM) ६५ व्या वार्षिक परिषदेत गडकरी आज बोलत होते.विकसित भारत २०४७ च्या संकल्पपूर्तीसाठी शाश्वत वाहतूक व्यवस्थेची प्रमुख भूमिका याविषयी प्रमुख उद्योजक आणि धोरणकर्त्यांनी या परिषदेत विचारविनिमय केला.
यावेळी मंत्री गडकरी यांनी शाश्वत वाहतूक व्यवस्थेबाबतचा सरकारचा दृष्टीकोन मांडला. ते म्हणाले, जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा वाहन उद्योग असलेल्या भारतात आरामदायी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुरविण्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. हवेच्या प्रदूषणाच्या समस्येचा सामना करण्यासाठी आम्ही BS7 व CAFE या जागतिक मानकांचे पालन करू. याशिवाय जैवइंधनाच्या वापरामुळे कच्च्या तेलाची आयात कमी करणे आणि शेतकऱ्यांची उत्पन्न वाढ यासाठी चालना मिळते. ३ लाखांपेक्षा जास्त वाहने, स्क्रॅपिंग धोरणाच्या कार्यान्वयानंतर भंगारात काढल्यामुळे उद्योगजगत, सरकार व पर्यावरणालाही लाभ झाला.