इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
विरोधी पक्षातीली एका बड्या नेत्याने मला पंतप्रधानपदाची ऑफर दिली असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितल्यामुळे त्यावर आता प्रतिक्रिया उमटू लागल्या आहे. यावेळी त्यांनी मला कोणत्याही पदाचा मोह नाही, मी ती ऑफर नाकारली, असेही त्यांनी सांगितले. नागपूरमधील पत्रकारिता पुरस्कार सोहळ्यात नितीन गडकरी यांनी हे विधान केले.
या कार्यक्रमात बोलतांना ते पुढे म्हणाले की, मला ऑफर देणा-या नेत्याला मी म्हटलं की मी माझ्या विचारधारेशी प्रामाणिक आहे. मी माझ्या पक्षाशी प्रामाणिक आहे. माझ्या पक्षाने मला ते सगळं दिले, ज्याबद्दल मी माझ्या स्वप्नातही विचार केला नव्हता. त्यामुळे असा कोणत्याच प्रस्तावाला मी बळी पडत नाही. मी कोणत्याही पदासाठी तडजोड करणार नाही. मी माझ्या विचारधारेवर चालत राहील असे ते म्हणाले..
यावेळी त्यांनी या नेत्याचे नाव न घेता सांगितले की, या नेत्याने सांगितले की, तुम्ही जर पंतप्रधान होणार असाल तर तुम्हाला आमचे समर्थन असेल. मी त्यांना विचारले की तुम्ही मला पाठिंबा का देत आहात? आणि मी तुमचे समर्थन का घेऊ? मी त्यांना सांगितले की पंतप्रधान होणे हे माझे ध्येय कधीच नव्हते. मी पूर्णपणे झोकून देऊन माझे काम करतो. माझ्या कामावर माझी श्रद्धा आहे, असेही ते म्हणाले.