मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रख्यात कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या आत्महत्येने संपूर्ण कलाक्षेत्राला जबरदस्त धक्का बसला आहे. त्यांच्या आत्महत्येमुळे बँकांचे कर्ज, ते वसूल करण्यासाठी आजमावण्यात येणारे त्रासदायक हतखंडे यांवर जोरात चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर त्यांना कर्ज देणाऱ्या एडलवाईस कंपनीचे संचालक गोत्यात आले असून त्यांची चौकशी होणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, याप्रकरणी खालापूर पोलिसांनी ५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
नितीन देसाई यांनी १८० कोटींचे कर्ज घेतले होते. त्यापोटी त्यांनी स्वत:ची संपत्ती गहाण ठेवली होती. त्यांना एडलवाईस कंपनीने कर्ज दिले होते. दरम्यानच्या काळात देसाई कर्जाचे हफ्ते फेडण्यात अपयशी ठरले. त्यामुळे बँकेने त्यांच्यामागे ससेमिरा लावला होता. परिणामत: देसाई प्रचंड निराश झाले होते. त्यांना बँकेकडून मानसिक त्रास झाल्याची देखील माहिती आहे. ही सर्व परिस्थिती लक्षात घेता एडलवाईस कंपनीचे संचालक रसेश शाह यांच्याही चौकशीची शक्यता व्यक्त केली जात आहे. नितीन देसाईंच्या आत्महत्येप्रकरणी एडलवाईस कंपनी व कंपनीचे संचालक रसेश शाह यांची चौकशी होणार असल्याचं बोललं जात आहे. रसेश शाह यांनी अहमदाबाद आयआयएममधून १९८९ साली शिक्षण पूर्ण केलं. सुरुवातीच्या काळात रसेश शाह यांनी आयसीआयसीआय वित्त कंपनीमध्ये वरच्या पदावर नोकरी केली. १९९५ साली त्यांनी नोकरीचा राजीनामा देऊन आयसीआयसीआयमधील त्यांचे सहकारी वेंकट रामास्वामी यांच्याशी भागीदारीत एडलवाईस कंपनीची स्थापना केली.
या ५ जणांवर गुन्हा दाखल
नितीन देसाई यांच्या पत्नी नेहा यांनी दिल्या तक्रारीची गंभीर दखल खालापूर पोलिसांनी घेतली आहे. नेहा देसाई यांनी तक्रारीत म्हटले आहे की, ईसीएल फायनान्स कंपनी/ एडलवाईस ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी कर्ज प्रकरणामध्ये वारंवार तगादा लावला. तसेच मानसिक त्रास दिला. त्या मानसिक त्रासाला कंटाळून नितीन देसाई यांनी आत्महत्या केली आहे. या तक्रारीच्या आधारेच पोलिसांनी ५ जणांविरुद्ध कलम ३०६ आणि ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
देसाईंचे कर्ज गेले होते ‘एनपीए’त
नितीन देसाईंच्या आत्महत्येनंतर त्यांच्यावर जवळपास २५० कोटींचे कर्ज असल्याची बाब समोर आली आहे. सुरुवातीला १८० कोटींचे असणारे हे कर्ज वेळेवर न फेडले गेल्यामुळे व्याजाची रक्कम वाढून थेट २५० कोटींच्या घरात गेले. देसाई यांच्या एनडीज् आर्ट वर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेडने एडलवाईज समूहातील ईसीएल फायनान्सकडून २०१६ आणि २०१८ असे दोन टप्प्यांत एकूण १८१ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. ३१ मार्च २०२२ व ९ मे २०२२ अशा अनुक्रमे दोन परतफेडीच्या अंतिम तारखा होत्या. त्या पाळल्या न गेल्याने हे कर्ज बुडीत खात्यात अर्थात ‘एनपीए’ म्हणून वर्ग करण्यात आले होते.
nitin desai suicide case khalapur police case registered
neha desai bollywood nd studio art director