विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली :
सध्याच्या काळात प्रत्येकालाच चार चाकी वाहन हवे असून ते दणगट आणि आकर्षक असावे, असे देखील वाटते. सहाजिकच गेल्या काही महिन्यांमध्ये अशा वाहनांची मागणी वाढली असून यात एसयूव्हीच्या या वाहनांचा अव्वल क्रमांक आहे. कॉम्पॅक्ट म्हणजेच आटोपशीर आणि छोट्या एसयूव्ही वाहनांची विक्री भारतीय बाजारात सातत्याने वाढत आहे. हॅचबॅक आणि सेडान कारपेक्षा लोक या सेगमेंटला अधिक प्राधान्य देत आहेत. त्यातच ग्राहकांची पसंती विशेषतः निसानच्या सर्वात स्वस्त एसयूव्ही मॅग्नाईट दिसून येत आहे. त्यामुळे एसयूव्ही लाँच झाल्यापासून, ६० हजारहून अधिक वाहन – युनिट्सची बुकिंग तथा नोंदणी केली गेली आहे, असे कंपनीने जाहीर केले आहे.
निसान इंडिया कंपनीने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मॅग्नाइट एसयूव्ही सादर केली. त्यावेळी या एसयूव्हीची किंमत ५ लाख रुपयांपेक्षा कमी होती, परंतु आता त्याची किंमत ५ लाख ५९ हजार ते १० लाखांच्या दरम्यान आहे. निसान इंडिया सातत्याने ग्राहकांना चांगल्या सेवा प्रदान करण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या ही कंपनी निसान कॉस्ट कॅल्क्युलेटर, निसान ‘बुक अ सर्व्हिस’ आणि निसान ‘पिक-अप आणि ड्रॉप-ऑफ’ सेवा यासारख्या सेवा देते. सदर कंपनीचा दावा आहे की, नवीन निसान मॅग्नाईटच्या टॉप व्हेरियंट्सचे XV आणि XV (प्रीमियम) या वाहनांना सुमारे ६० टक्के लोकांनी पसंती दिली आहे. या व्यतिरिक्त, सुमारे ३० टक्के लोकांनी CVT स्वयंचलित वाहनाचा पर्याय निवडला आहे. सर्वात विशेष म्हणजे या एसयूव्हीचे ऑनलाईन बुकिंग देखील खूप अधिक होत आहे. वास्तविक बुकिंग आणि विक्री या दोन भिन्न गोष्टी आहेत, कारण काही वेळा लोक बुकिंग रद्द देखील करतात. त्यामुळे बुकिंग आणि विक्रीचे आकडे बदलू शकतात.
निसान मॅग्नाइटच्या एका वाहन प्रकारात कंपनीने १ लिटर टर्बो पेट्रोल इंजिन वापरले असून ते ९९ बीएचपी पॉवर आणि १६० एनएम टॉर्क जनरेट करते. याशिवाय, ही एसयूव्ही १ लीटर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिनसह देखील उपलब्ध आहे, जे ७१ बीएचपी पॉवर आणि ९६ एनएम टॉर्क जनरेट करते.
याशिवाय एसयूव्हीला त्याच्या सेगमेंटनुसार चांगले फिचर्स देखील मिळतात. यात एलईडी स्कफ प्लेट, अॅम्बियंट मूड लाइटिंग, वायरलेस चार्जर, एअर प्युरिफायर आणि जेएनएल स्पीकर्स मिळतात. तसेच कंपनीने XV प्रीमियम व्हेरिएंटमध्ये निसान कनेक्टेड टेक्नॉलॉजीचा समावेश केला आहे, त्यामुळे ऑटोमेटेड रोड साइड असिस्टन्स, व्हेइकल ट्रॅकिंग, व्हेइकल हेल्थ इन्फो, जिओ फेंस, स्पीड अलर्ट आणि व्हेइकल स्टेटस सारखी वैशिष्ट्ये मिळतात.