आजकाल काजवा महोत्सव हा धंदा होत चालला आहे. एक तंबुतील रात्र ,जेवण आणि काजवे दर्शन यांचे एवढे पैसे वगैरे. पण दुसऱ्यादिवशी कोणी जाऊन बघता का, की आपण किती निसर्गनासाडी केली ते? असो हा विषय जे लोक व्यवस्थापक असतात आणि जे लोक मजा करायला जातात त्यांनी लक्ष्यात घ्यायला पाहिजे. निसर्गात भान हरपून जाते ते खरे आहे ,पण भान ठेवून सुद्धा निसर्गाची मजा लुटता येते.
नाशिकच्या पश्चिमेकडील भाग तसा डोंगर दऱ्यानी दाटलेला आहे.त्यामुळे पावसाळयात येथील सौंदर्य अतिशय खुलून दिसते. नाशिक जव्हार रस्त्यावर त्रिंबकेश्वर पासून जेमतेम 10 ते 12 किमी. वर असेल एक छानसे टुमदार खेडे आहे आंबोली. पुढे वरून खाली जाणार घाट लागतो.उजव्या बाजूस छान पसरत जाणारी दरी दिसते. त्याच्या घाटमाथ्यावरच माझे मित्र सागर मराठे यांनी ‘साहस ‘ऍडव्हेंचर कॅम्प उभारला आहे.येथून पश्चिमेचा निसर्ग अनुभवण्यात जी मजा आहे ती कुठेही नाही.
ह्या पश्चिमेच्या दरीतच वळवाचा पावसाच्या एक दोन सरी पडून गेल्यावर काजवे महोत्सव चालू होतो. महोत्सव म्हणण्याचे कारण म्हणजे ,प्रचंड संख्येने लुकलुकणारे काजवे दिसतात. सूर्यास्तानंतर एक ते दीड तासांनी काही विशिष्ठ झाडांवर हे लुकलुकणारे काजवे बघितले की, भान हरपून आपण एक निसर्गाचा चमत्कार बघतच राहतो. ‘कट्यार काळजात घुसली’ ह्या सिनेमात दाखवल्याप्रमाणे ,आपण खऱ्या दुनियेत हे अनुभवत असतो.
सिनेमात फोटो इफेक्ट मुळे ते शक्य झाले, पण प्रत्यक्षदर्शी हे आपण अनुभवत असतो. माझे, एक सत्तर वर्षांचे स्नेही दाम्पत्याला घेऊन मी हे दृश्य दाखवायला घेऊन गेलो होतो. त्यांच्या डोळ्याचे पारणे फिटले, आणि आनंद अश्रूंना वाट फुटली. त्यांच्या उभ्या आयुष्यात असे दृश्य त्यांनी पाहिले नव्हते.
फुलपाखरापाठोपाठ मानवाला सर्वात जास्त रोमांचक ठरणार कीटक म्हणजे काजवा. हिंदीत यास जुगनू असे सार्थ नाव आहे. आपण एखाद्याला ‘काजवे चमकवू का’ हे नकारात्मक भावनेने बोलतो. पण चमचमते काजवे बघणं हा एक योगाभ्यास ठरू शकतो व त्यामुळे आपला मनावरील स्ट्रेस नाहीसा होऊ शकतो.
काजवा हा कीटक उष्ण आणि समशीतोष्ण कटिबंधातील भागात दिसतो. काजवा हा Lampyridae फॅमिली मध्ये येतो. हा एक भुंगेऱ्याचा (Beetle) चा प्रकार आहे. Lampy म्हणजे प्रकाश देणारा. काजवे साधारणतः दोन सेंमी. लांब, मऊ शरीराचे असून मंद काळसर, भुरे, पिवळे किंवा तांबूस रंगाचे असतात. त्याला चार पंख असतात.आणि त्यांचे उडणे कमी वेगाचे असते.
उडताना छानसा मंद ,शीतल निळसर पिवळा फ्लोरोसेन्ट प्रकाश ,त्याच्या शरीराच्या खालच्या बाजूने दिसतो.काजव्यांचा प्रकाश असामान्य आहे. त्याला शीत प्रकाश असेही म्हणतात.या शीत प्रकाशाचा अभ्यास झाल्यास त्याचा व्यवहारात खूपच उपयोग करता येण्याची शक्यता आहे. मादी, अळीच्या स्वरूपात असते, तिला ग्लोवर्म असेही संबोधतात.
नर हा उडणारा असतो आणि रात्री भ्रमण करतो. मादी उन्हाळ्यात जमिनीच्या वरच्या थरात अंडी टाकते आणि वळवाच्या पावसाच्या सरीबरोबर पंख असलेले काजवा नर उडू लागतात. अर्जुन,सादडा या झाडांवर या काजव्याचा खेळ चालतो. त्यांच्या लुकलूकण्याचे बारकाईने निरीक्षण केल्यास त्या मध्ये सुद्धा एका विशिष्ठ लय दिसते.
एवढ्याश्या किटकाने ,एकमेकांसाठीचा लयबद्ध दिलेला प्रतिसाद बघून मन थक्क होते. हे क्षण डोळ्याने आणि मनानेच टिपू शकतो. छायाचित्रण अतिशय कौशल्यपूर्ण केल्यास थोडा फार चांगला फोटो काढता येतो.
खरेतर सह्याद्रीच्या डोंगर दऱ्यात राहणाऱ्या आदिवासी लोकांना ही नित्य नेमाचीच गोष्ट आहे. परंतु शहरात राहणाऱ्या लोकांसाठी,मुलांसाठी हा निसर्ग चमत्कार प्रेक्षणीय ठरतो यात दुमत नाही. काजव्यांच्या लुकलूकण्या वरूनच, दिवाळीतील LED लाईटच्या लुकलूकणाऱ्या दिपमाळांची संकल्पना आली असावी. निसर्गात अश्या खूप गोष्टी आहेत ,की त्यांच्या निरंतर अभ्यासाची मानवाला गरज आहे.
(सर्व फोटो – नितीन बिलदीकर)
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!