विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
भारतात कोरोनाची दुसरी लाट थैमान घालत आहे. त्यामुळेच त्याची जगभरात चर्चा होत आहे. असे असतानाच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना घरचा आहेर मिळाला आहे. त्यांचे पती तथा अर्थतज्ज्ञ परकला प्रभाकर यांनी चांगलेच सुनावले आहे. ज्यावेळी आरोग्य सुविधा वाढविणे आवश्यक होते तेव्हा भारतात थाळ्या वाजविल्या जात होत्या, असा टोलाच त्यांनी लगावला आहे.
दुसरी लाट येणार आणि ती पहिल्या लाटेपेक्षा अधिक गंभीर असणार असा इशारा देण्यात आला होता. त्याअनुषंगाने चर्चाही झाली पण अंमलबजावणी काहीच नाही केली. आपण गाफील राहिल्यानेच आज जे काही होते आहे ते आपण पाहत आहोत, असे प्रभाकर यांनी म्हटले आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत प्रभाकर यांनी अतिशय रोखठोक मते मांडली आहेत. ज्या काळात लॉकडाऊन लावले त्या काळात योग्य त्या आरोग्य सुविधा वाढविणे आणि सशक्त करणे आवश्यक होते. लॉकडाऊन हा योग्य पर्याय नाही. केंद्र सरकारच्या कामकाजाबद्दल प्रभाकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून सर्वसामान्य आणि स्थलांतरीत मजूर यांचे प्रचंड हाल होत असल्याचे प्रभाकर यांनी म्हटले आहे. शिवाय सध्या अनेक जण आरोग्य सुविधेअभावी प्राण सोडत आहेत. ही अत्यंत लाजिरवाणी बाब असल्याचेही ते म्हणाले.