औरंगाबाद : भारूडकार आणि लोककलावंत निरंजन भाकरे यांचे आज सांयकाळी कोरोनामुळे निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. ‘ बुरगुंडा होईल बया गं ‘ या प्रसिद्ध भारुड यामुळे ते केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर भारतासह जगातील अनेक देशातील कानाकोपऱ्यात पोहोचले होते.
निरंजन भाकरे यांनी ९० मीटर कापडाचा पायघोळ तयार करून घेतलेली गिरकी चर्चेत होती. मुंबईतील एका कार्यक्रमात त्यांनी ७५ मीटर इंच घेर असलेल्या या पायघोळाच्या गिरकीची नोंद वर्ल्ड अमेझिंग रेकॉर्डमध्ये करण्यात आली होती. राज्यात कोठेही जा, ‘बुरगुंडा होईल बया गं’ असे भारुड ऐकले की, निरंजन भाकरे आठवल्याशिवाय राहत नसे. भारुडाला जिवंत ठेवणारा हा गुणी कलावंत नेहमी सरकारच्या विविध योजना सर्वसामान्यपर्यंत पोहोचवत असे.
सोंगी भारुड लोककलेत मोठा पायघोळ असणारा अंगरखा परिधान केला. तो बनविण्यासाठी १८ हजार रुपये खर्च आला. साडेआठ किलोच्या या पायघोळासह २० किलो वजनाचा जडसांभार अंगावर घेऊन त्यांनी सलग अडीच तास आपली कला सादर केली होती. गणेश वंदना, वासुदेव, नंदीबैल, कुडबुडय़ा जोशी, भविष्यकार आणि त्यांचे प्रख्यात भारुड या सर्व पात्रांना रसिकांनी भरभरून दाद दिली होती. पाश्चात्त्य संस्कृतीचा पगडा आणि रिमिक्सचे अतिक्रमण यामुळे लोककला व लोकसंगीत हरवत चालले आहे. अशा काळात लोकप्रबोधनासह भारतीय कला जपण्याचा हा प्रयत्न त्यांनी केला होता.
लोककलेच्या परंपराचा आपण आदर बाळगला पाहिजे. लोककलेचा समृद्ध वारसा जोपासण्याची गरज आहे, भारुडकार स्व. निरंजन भाकरे नेहमी म्हणत. तसेच लोककलेतून लोकांच्या भाषेत लोकांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग मिळतो. लोककलेत ७२ बहुरुपींच्या कला आहेत. त्यातील अनेक लोककला आज लोप पावत चालल्या आहेत. लोककलेच्या परंपराचा आपण आदर बाळगला पाहिजे. लोककलेचा समृद्ध वारसा जोपासण्याची गरज आहे, असेही निरंजन भाकरे म्हणत असत. त्यांचे वडील जुने नाटकर्मी होते.
अनेक नाटकात त्यांनी काम केले. त्यामुळे घरातून कलेचा वारसा मिळाला. लहानपणी त्यांनी सुद्धा ग्रामीण भागातील नाटकात छोट्या भूमिका केल्या. कलापथकात ते हार्मोनिअम वाजविण्याचे काम करायचे. कार्यक्रमानिमित्त ठाणे येथे होतो. प्रसिद्ध गीतकार आणि लोककला अभ्यासक अशोकजी परांजपे त्यांचे गुरू होते, त्यांनीच भाकरे यांना लोककलेचा मार्ग दाखविला. आणि भारुड लोककलेला त्यांनी सर्वस्व जीवन अर्पण केले. त्यांच्यामुळे भारुड आज सातासमुद्रापार पोहोचले आहे. अमेरिका, मलेशिया, थायलंडमध्ये भाकरे यांचे कार्यक्रम झाले.