नाशिक – कबड्डी हा राष्ट्रीय खेळ असला तरी भारतीय उपखंडात क्रिकेटचे वेड अधिक आहे. क्रिकेटचे चाहते घराघरात सापडतात. भारतातच नव्हे, तर परदेशातील भारतीयांमध्येही क्रिकेटचे प्रचंड वेड आहे. मूळचा नाशिकचा असलेला आणि आता अमेरिकन प्रीमिअर लीगमध्ये खेळणारा नीरज परांजपेसुद्धा असाच एक तरुण आहे ज्याने नाशिकचा झेंडा सातासमुद्रापार फडकावला आहे. अमेरिकन क्रिकेट मंडळाच्या अमेरिकन प्रीमिअम लीग २०२१ चा पहिला हंगाम यावर्षी सुरू होणार आहे. न्यूजर्सी येथे २० ते ३० सप्टेंबरदरम्यान होणार्या या स्पर्धेत ७ संघ सहभागी होणार आहेत. गेल्या चार महिन्यांपासून प्रीमिअर लीगमधील विविध संघांच्या खेळाडूंची निवड चाचणी सुरू होती. नाशिकचा नीरज शेखर परांजप याची टीम बेंगाली या संघात निवड झाली आहे.
नाशिकचा अभिमान
लहानपणापासून क्रिकेटची आवड असल्यामुळे व्यावसायिक कामांशिवाय नीरज क्रिकेट खेळत आहे. विविध स्पर्धा आणि महत्त्वाच्या लीगमध्ये तो सहभागी होतो. कठोर परिश्रम घेऊन तो खेळात सातत्य ठेवत आहे. त्यामुळेच त्याला प्रतिष्ठीत स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली आहे. नीरजचे शालेय शिक्षण नाशिकमधील रचना विद्यालयात झाले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून अभियांत्रिकी पदवी संपादन केली. त्यानतंर एका प्रतिष्ठीत आयटी कंपनीत तो कार्यरत आहे.