टोकियो – ऑलिम्पिक स्पर्धेतील बुधवारचा दिवस भारतासाठी उत्तम ठरला आहे. भालफेक स्पर्धेत भारताचा अॅथलीट नीरज चोप्रा याने सर्वोत्तम कामगिरी करत अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. नीरज चोप्राला अंतिम सामन्यात प्रवेश करण्यासाठी ८३.५ मीटरचे आव्हान होते. परंतु त्याने ८६.६५ मीटरपर्यंत भालाफेक करून अंतिम सामन्यात दमदार प्रवेश केला. पात्रता फेरच्या अ गटात नीरज चोप्रा वरच्या क्रमांकावर आहे. नीरजकडून आता पदकाची अपेक्षा केली जात असून, सर्व भारतीयांच्या नजरा त्याच्या कामगिरीकडे खिळल्या आहेत.
दरम्यान, पदकाच्या अपेक्षा उंचावलेल्या महिला हॉकी संघाचा उपांत्य फेरीचा सामना अर्जेंटिनाविरुद्ध होणार आहे. महिला संघाने बलाढ्य ऑस्ट्रियाला नमवून महिला संघाने इतिहास रचला आहे. महिला हॉकी संघ प्रथमच उपांत्य फेरीत पोहोचला आहे. भारतीय महिला संघ सुवर्णपदकापासून दोन पावले दूर आहे. उपांत्यफेरीचा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी ३.३० वाजता सुरू होणार आहे. भारतीय पुरुष हॉकी संघाचा उपांत्य सामन्यात बेल्जिअमकडून पराभव झाला होता.
भारताचे आजचे सामने
बॉक्सिंग (सकाळी ११ वाजता) – महिलांच्या ६९ किलो वजनीगटात उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताची लव्हलिना बोरगोहेन विरुद्ध तुर्कीच्या बुसेनाज सुरमेनेली आमनेसामने असेल.
महिला ह़ॉकी (दुपारी ३.३० वाजता) – महिला हॉकी संघाचा सामना अर्जेंटिना संघाशी रंगणार आहे. हा सामना जिंकल्यास भारतीय संघ अंतिम फेरीत पोहचणार आहे. त्यामुळे भारताचे पदक निश्चित होणार आहे.
गोल्फ (सकाळी ४ वाजता) – अदिती अशोक आणि दीक्षा डागर, महिलांच्या वैयक्तिक स्ट्रोक प्ले, पहिली फेरी