नवी दिल्ली – भारतीय लष्कराच्या दक्षिण कमांडचे सुभेदार नीरज चोप्रा यांनी आज ऑलिम्पिक स्पर्धेत ८७.५८ मीटर भालाफेक करत, ट्रॅक अँड फिल्ड सुवर्णपदक जिंकत नवा इतिहास रचला आहे. नीरज चोप्रा यांनी आपले प्रशिक्षण पुण्याच्या आर्मी स्पोर्टस इन्स्टिट्यूट मध्ये केले आहे. सुभेदार नीरज मूळचे हरियाणाच्या पानिपत जिल्ह्यातल्या खांदरा गावातल्या शेतकरी कुटुंबातले आहे. २६ ऑगस्ट २०१६ साली, नायब सुभेदार पदावर भारतीय लष्करात ज्युनिअर कमिशन्ड ऑफिसर म्हणून ते रुजू झाले . नीरजला २०१८ साली अर्जुन पुरस्कार आणि २०२१ साली त्यांच्या नेत्रदीपक कामगिरीसाठी विशिष्ट सेवा पदकाने गौरवण्यात आले आहे. त्यांच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल, तसेच भारतीय लष्कर आणि संपूर्ण देशाचा गौरव वाढवल्याबद्दल, दक्षिण कमांडचे प्रमुख, लेफ्टनंट जनरल जे.एस. नैन यांनी अभिनंदन केले आहे.
असे आहे महाराष्ट्राशी नाते
नीरज चोप्रा यांचे पूर्वज हे महाराष्ट्रातील आहे. पानिपतच्या लढाईत जे मराठा सैनिक वाचले. ते पानिपत येथेच स्थायिक झाले. त्यांना रोड मराठा म्हटले जाते. महाराष्ट्रातील संस्कृतीच्या खुणा आजही येथे आहेत. या सर्वांचे महाराष्ट्राशी खूप भावनिक नाते आहे.