सुदर्शन सारडा, नाशिक
गोदावरी, बाणगंगा आणि कादवा नद्यांना सध्या सुरू असलेल्या पावसामुळे दुसऱ्यांदा पूर दृश्य परिस्थिती दिसली.पाऊसाचा वेग कमी झाला पण कादवेचे पात्र मोठे आणि संथ म्हणून ओळखले जाते. पिंपळगाव,निफाड मधल्या पाराशरी आणि वडाळी नद्याही ओसंडून वाहत आहे. या सगळ्या नद्यांना पुढे जायकवाडीला जाऊन नाथ सागराला आलिंगन द्यायचे असल्याने त्यांना गोदावरीत मिसळने क्रमप्राप्त आहे. अशा काही नद्यांची ही हरिहर भेटच समजावी. तशीच काहीशी परिस्थिती राजकीय कलगीतूऱ्यात सध्या निफाड तालुका रोज अनुभवत आहे. नुकत्याच लोकसभा निवडणुका होऊन निकाल लागले यात महाविकास आघाडीने एकरूप होऊन तुतारी वाजवत बाजी मारली तर महायुती मात्र पिछाडीवर राहिली.
पूर्व प्रथेप्रमाणे साधारण आषाढ संपण्याच्या आठवड्यापूर्वी तालुकास्तरीय नेत्यांचे हेवेदावे सुरू होऊन जातात तर श्रावणाचे पावित्र्य मनात ठेऊन समस्त कार्यकर्त्यांना आपुलकी मिळायला सुरवात होते. एकीकडे श्रावण संपण्यात काही अवधी शिल्लक आहे तर दुसरीकडे पूरदृश्य परिस्थिती शमल्यात जमा आहे. तरी अशा राजकीय स्थितीत आघाडी आणि युती कितपत टिकाव धरते ते पाहणे अधिक महत्वाचे आहे. सध्याच्या पावसाचा बुलंदपणा नेत्यांच्या शब्दापेक्षाही अधिक महत्वाचा ठरतो आहे. सध्या पिंपळगाव नगरीत आमदारकी असल्याने त्याला कादवेची किनार आहे तर पाराशरी नदी हृदयस्थ आहे. दिलीप बनकर सध्या कामांच्या जोरावर नो कमेंट्स म्हणत काम आणि कार्यकर्ते यांची सांगड घालत आहे. दुसरीकडे त्यांचे प्रतिस्पर्धी अनिल कदम यांचे निवासस्थान बाणगंगेच्या किनारी असल्याने तीही वाहत आहे.
त्यांनी ज्या निशाणीवर दोनदा आमदारकी मिळवली त्यात बाण होताच परंतु भास्कर भगरे यांच्यासाठी जीवाचे रान करून त्यांनी राजकीय वलय स्थापित करत पुन्हा ‘हाऊ इज द जोश’ म्हणत शरद पवारांना कार्यवाहक तर उध्दव ठाकरेंना प्रेषक म्हणून मनात ठेवले आहे. त्यामुळेच उध्दव ठाकरे यांची भेट घेत केलेला मशालीचा दावा योग्यच म्हणावा. त्यांचेच चुलत भाऊ यतीन कदम यांचे निवासस्थान ही बाणगंगा किनारीच आहे. हीच बाणगंगा दोन वर्षांपासून वाहण्याचे नाव घेत नव्हती आता कुठे तिच्या पात्रेत पाणी दिसू लागले आहे.
दुसरीकडे आपल्या गावची नदी आता वाहू लागल्याने पाहून दोन्ही कदम बांधून आनंदाश्रू तर येणारच. काही दिवसांपूर्वी भाजपचा मेळावा घेत यतीन कदम यांनी भारती पवारांना अजित दादांच्या गटाची साथ न मिळूनही मिळालेली आकडेवारी जनतेसमोर मांडली. त्यांच्या बेरीज वजाबाकीत जे कष्ट घेतले ते फक्त भाजपनेच घेतले असा त्याचा सरळ अर्थ होता. त्यांनी निफाड जागे बाबत बाबत भाजपचाच दावा असल्याचे सांगत तशी फिल्डींग ही लावल्याचे बोलले जाते. सध्या सर्वत्र ढगाळ वातावरण पाहता धर्म जागो युतीचा हे ब्रीद वाक्य विधानसभेला राहण्याची शक्यता सध्याच्या डोळ्यात दिसणाऱ्या चित्राने धूसर होत चालल्याचे काही जाणकार सांगतात. निफाडचा कार्यकर्ता हुशार तर मतदार अतिशय रुबाबदार समजला जातो. ही वेळ जोश वाढवण्याची आणि सोशल मीडियावर फ्लॅश होण्याची असल्याने आघाडी, युती आणि त्यातील कलगीतुरे समजायला सध्यातरी अवकाश आहे. याहूनही वेगळे म्हणजे शरद पवार या ब्रँड वर बाणगंगा किनारचेच राजेंद्र मोगल इच्छुक असून वडाळी काठचे बाळासाहेब क्षीरसागर यांनीही शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून शरद पवार यांचा सत्कार करून फोटो मोबाईल मध्ये जपून ठेवलाय. अशातच मायभूमी असलेल्या गोदाकाठचेच गुरुदेव कांदे यांनीही दौरे सुरू केले आहे.
तालुक्यातील सर्वच नद्यांना सध्या पुरदृश्य परिस्थिती आहे. दुथडी भरून पात्र पुन्हा जैसे थे होऊनही जाईल पण राजकीय हेव्यादाव्यांचा पूर ओसरायला मात्र तीन महिने लागतील.खरे म्हणजे जसा आपल्या नद्यांचा उद्देश नाथसागर मध्ये जाण्याचा आहे तसाच निफाडचा राजकीय पूर मुंबईत अरबी समुद्राकिनारी जाऊन मिळेल. त्या समुद्रात पाय ओले करणारा एकच असेल कारण अरबी समुद्राचं पाणी खारट आहे हे सर्व इच्छुकांना तर पक्क ठाऊक असणारच!