सुदर्शन सारडा, ओझर
विधानसभेच्या निवडणुकीत पक्षांतर वारे आणि उमेदवारीचा जोश सोबतीने वाहत असताना निफाडचे पिक्चर एकदाचे क्लिअर झाले आहे. विद्यमान आमदार दिलीप बनकर हे महायुती,अनिल कदम महाविकास आघाडी, गुरुदेव कांदे हे प्रहार कडून उमेदवार असतील तर यतीन कदम यांचा लढण्याचा राजकीय निर्णय अद्याप घोषित झालेला नाही.
नाशिकच्या राजकीय रणसंग्रामात निफाड तालुका हा महत्वाचा केंद्रबिंदू राहत आला असताना त्याला नेत्यांच्या महत्वकांक्षेमुळे पाठबळ ही त्याच मापात मिळत गेले. परंतु त्याला त्या स्थरावर नेण्यात येथील सहकार धोरण ही तितकंच केंद्रस्थानी होते. सद्यस्थिती पाहता घोषणा, आश्वासन आणि कार्यकर्ते यापलीकडे निफाडकडे काहीही राहिलेले नाही. आता उरला प्रश्न सध्याच्या विधानसभेच्या उमेदवारीचा तर प्रमुख चार चे सहा पक्ष होऊनही महायुती आणि महविकास आघाडीत जिल्ह्यातल्या मोठा तिढा गुंतून राहिला असताना निफाड मात्र निर्धास्त झाल्याचे एकूण घडलेल्या घडामोडी वरून स्पष्ट झाले आहे.
सोमवारी अजित पवार गटाने ज्या उमेदवारांना एबी फॉर्म दिले त्यात दिलीप बनकर यांचे नाव होते पण ते मतदारसंघात असल्याने ते मुंबईत पोहोचू शकले नाही. याबाबत तालुक्यात चर्चांना उधाण आले होते. परंतु खुद्द दिलीप बनकर यांनी स्मित स्वभाव अंगिकारत उमेदवारी बाबत तो विषय सोडून बोला म्हणत महायुतीचे पत्रकच वाटायला सुरवात केली. दुसरीकडे महविकास आघाडी कडून लोकसभा निवडणुकीनंतर दिल्लीत शरद पवार यांच्या मुखातून आपल्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब मिळवलेले अनिल कदम मात्र मशाल घेत मतदारसंघ पिंजून काढत आहे. सध्या कदम हे गटनिहाय बैठका घेत मिसळ पार्टीतून आपले विचार व्यक्त करत आहे. तिकडे बनकर-कदम यांच्या आधी प्रहार कडून उमेदवारी घोषित झालेले गुरुदेव कांदे यांनीही तरुणांची मोठ बांधत मतदारसंघांत भेटीगाठी सुरू केल्या आहे.
मागच्या निवडणुकीत अपक्ष लढलेले यतीन कदम यंदा भाजप कडून प्रबळ दावेदारी सांगत आहेत. परंतु महायुती असल्याने आणि निफाडमध्ये विद्यमान राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार असल्याने ती जागा दादांच्या वाट्याला गेली. तरी देखील मतदारसंघातील आपल्या दौऱ्यात यतीन कदम यांनी कुठंही कसरत न करता मतदारसंघ पिंजन्याचे सुरूच ठेवले. काही दिवसांपूर्वी त्यांच्या आई माजी आमदार मंदाकिनी कदम आणि यतीन यांनी मुंबईत काही वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेत आपली दावेदारी सांगितल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.
तूर्तास महायुती, महाविकासआघाडी आणि प्रहारचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर भाजप नेते यतीन कदम हे नेमकी काय भूमिका घेतात इतकेच बघणे बाकी आहे.
राजकीय बुद्धिबळात कौशल्य दाखवणारा निफाड सध्याच्या स्थितीत संथ झाला असून काही दिवसांनी हाच निफाड राजकीय उसळी घेण्याची तयारी करत असल्याचे सुरू असलेल्या एकूण घडामोडींवरून स्पष्ट होत आहे.
असे ठरले उमेदवार!
दिलीप शंकरराव बनकर :राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार)
अनिल साहेबराव कदम: शिवसेना (उबाठा) महाविकास आघाडी
गुरुदेव द्वारकानाथ कांदे: प्रहार
यतीन रावसाहेब कदम:
अपक्ष अथवा कोणता राजकीय पक्ष त्यांना उमेदवारी देणार हे लवकरच समजेल.