आमदार दिलीप बनकर यांनी दिली माहिती
पिंपळगाव बसवंत: निफाड तालुक्यातील १२ हजार २७७ अनुसूचित जमातीतील नागरीकांनी खावटी कर्ज अनुदानासाठी प्रस्ताव सादर केले होते. त्यापैकी सुमारे ११ हजार १९४ लाभार्थ्यांच्या खात्यात प्रत्येकी रक्कम २ हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात वर्ग झाल्याची माहिती आमदार दिलीप बनकर यांनी दिली.
राज्य दरवर्षी पावसाळ्यात माहे जून ते सप्टेंबर या कालावधीत रोजगार उपलब्ध नसल्याने आर्थिक विवचनेतून अनुसूचित जमातीच्या कुटुंबियांची उपासमार होऊ नये म्हणून १९७८ पासून खावटी योजना राज्य शासनाकडून सुरु केलेली होती. साधारण २०१३-१४ पासून बंद असलेली खावटी योजना १२ ऑगस्ट २०२० रोजीच्या मंत्री मंडळाच्या बैठकीत पुनर्जीवित प्रस्तावास मान्यता मिळाली. २२ मार्च २०२० पासून कोरोना महामारीच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आला. परंतु कामे बंद असल्यामुळे अनुसूचित जमातीच्या कुटुंबीयासमोर बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला. रेल्वे, सार्वजनिक बस वाहतूक, खाजगी वाहतूक बंद असल्याने अनुसूचित जमातीच्या कुटुंबीयाच्या अन्नधान्याची उपलब्धता व रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला. अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये अनुसूचित जमातीच्या कुटुंबास न्याय देण्याच्या दृष्टीने १०० टक्के रोखीने खावटी कर्ज वाटप करण्याच्या निर्णयातून सुट देऊन हि योजना १०० टक्के अनुदानित योजना १ वर्षासाठी म्हणजेच सन २०२०-२१ पुनश्च सुरु करण्यात आली. या कर्जाचे वाटप ५० टक्के वस्तू स्वरुपात व ५० टक्के रोख स्वरुपात करण्यात येते. वस्तू स्वरुपात मटकी, चवळी, हरभरा, वटाणा, उडीद डाळ, तुरडाळ, साखर, शेगदाना तेल, गरम मसाला, मिरची पावडर, मीठ, चहापती इत्यादी वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे. निफाड तालुक्यातील सुमारे १२ हजार २७७ अनुसूचित जमातीतील नागरीकांनी खावटी कर्ज अनुदानासाठी प्रस्ताव सादर केले होते. त्यातील सुमारे ११ हजार १९४ लाभार्थ्यांच्या खात्यात प्रत्येकी रक्कम रु.२ हजार बँक खात्यात जमा करण्यात आले असून ५० टक्के वस्तू स्वरूपातील किराणा माल लवकरच सबंधित लाभार्थ्याला मिळणार आहे. तसेच उर्वरित १ हजार ८३ लाभार्थ्यांच्या बँक खात्याची माहिती अथवा आधार अपदेशन नसणे अश्या अडचणी मुळे त्यांच्या खात्यात अद्यापपर्यंत रक्कम जमा होणे बाकी आहे. सदर लाभार्थ्यांनी लवकरात लवकर आपले बँक खाते माहिती सबंधित विभागास देण्यात यावी असे आवाहन आमदार दिलीप बनकर यांनी यावेळी केले.