योगेश सगर, निफाड
गोदाकाठ भागातील गंगानगर देवी मंदिर येथे शीर नसलेल्या तरुणाचा मृतदेह गोणपाटात सापडल्यावर मोठी खळबळ उडाली होती. फक्त धड असल्याने मृताची ओळख पटवणे अवघड असताना मृताच्या हातात सापडलेली रबरी बँडवरून पोलिसांनी आरोपींचा माग काढत त्याचा खून करणाऱ्या साथीदारांना पोलिसांनी मोठ्या शिताफीने बेड्या ठोकल्या आहे. मृत तरुणाचे नाव हितेश असून तो पेठ फाटा नाशिक येथील असून अजून त्याचे पूर्ण नाव व कौटुंबिक माहिती मिळवण्याचे काम पोलीस करत आहे,
सायखेडा पोलीस स्टेशनचत हद्दीत ११ फेब्रुवारीला सायंकाळच्या सुमारास गंगानगर देवी मंदिराजवळ गोदावरी नदीपात्रात शिर नसलेल्या युवकाचा मृतदेह मिळून आला होता घटनेतील अनोळखी युवकाचे अज्ञात व्यक्तींनी शिर (मुंडके) धडावेगळे करून मयताची ओळख पटू नये म्हणून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याचे धड गोणपटात टाकून स गोणपट तारेने बांधून गोदावरी नदीपात्रात टाकून दिले होते.
पिवळ्या रंगाच्या रबरी बॅन्डवरून ओळख
हा मृतदेह मिळून आल्यानंतर सायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ग्रामीणचे जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप व अपर पोलीस अधीक्षक माधुरी केदार-कांगणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सायखेड्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पप्पू कादरी यांनी पोलीस पथकांसह घटनास्थळास भेट देवून पाहणी केली होती. मयताच्या शरीराचे निरीक्षण केले असता त्याच्या हातावर गोंदलेले माँ व हितेश नाव तसेच अंगावरील कपडे, हातातील पिवळ्या रंगाच्या रबरी बॅन्डवरून त्याची ओळख पटविण्यासाठी नाशिक ग्रामीण व आयुक्तालय हद्दीतील पोलीस ठाणे, नजीकचे जिल्हे व राज्यांमध्ये तपास याद्या, प्रसिध्दीपत्रके प्रसारीत करण्यात आली होती.
तपासाची दिशा निश्चित
यावेळी मृत तरुणाच्या हातात मिळून आलेल्या पिवळ्या रंगाच्या रबरी बॅन्डबाबत स्थानिक बाजारात चौकशी केली असता प्रामुख्याने नाशिक शहर आणि शहरालगतच्या ओझर, पिंपळगाव, आडगाव परिसरात असे बॅन्ड विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. शवविच्छेदन अहवालवरून मृताला घटनेच्या चार ते पाच दिवस अगोदर मारण्यात आल्याचा अभिप्राय जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत गांगळे यांच्याकडून प्राप्त झाला होता. त्यावरून पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित करून नाशिक शहर व ओझर परीसरात मयत इसमाचा शोध सूरु ठेवला होता.
लोखंडी गजाने प्रहार
स्थानिक गुन्हे शाखेच्या दुसऱ्या पथकाने घटनास्थळी मिळून आलेल्या भौतिक व तांत्रिक बांबीचे अचूक विश्लेषण करून मिळालेल्या माहितीव्दारे खेरवाडी परिसरातून सदर गुन्ह्यात संशयित शरद वसंत शिंदे, आलीम लतीफ शेख यांना ताब्यात घेण्यात आले. संशयितांची विचारपूस केली असता ते दोघे खेरवाडी येथील शेतकरी जगदीश संगमनेरे व संदीप संगमनेरे यांच्या शेतात सालदार म्हणून शेतीकाम करीत होते. यातील जगदीश संगमनेरे यांनी मागील महिन्यात पेठ फाटा, नाशिक शहर परिसरातून हितेश नावाच्या मजूरास शेती कामकाजासाठी खेरवाडी येथे आणले होते.तेव्हापासून हितेश हा सालदार शरद व आलीम यांच्यासोबत शेतीकाम करीत होता. ७ फेब्रुवारीला रात्रीच्या सुमारास हितेश व शरद यांच्यात मोबाईल घेण्यावरून वाद झाला. त्यात हितेशने शरद व आलीम यास नाशिकवरून पोरं घेवून येतो व तूमचा बेत पाहतो, अशी धमकी दिल्याचा राग मनात धरून आलीम याने हितेशच्या डोक्यात लोखंडी गजाने प्रहार केल्याने तो रक्तबंबाळ होवून जागीच ठार झाला.
मानेवर घाव घालून त्यांचे धड व शीर वेगळे केले
ही घटना घडत असताना जमिन मालक जगदीश संगमनेरे, संदीप संगमनेरे व जगदीश यांचा मुलगा योगेश संगमनेरे त्याठिकाणी आले. त्यावेळी त्यांनी हा प्रकार पाहून गावात बदनामी होईल तसेच बटाईने करीत असलेली शेती जाईल, शेती कामास पुन्हा मजूर मिळणार नाही या भीतीने जगदीश व संदीप यांच्या सांगण्यावरून सालदार शरदने बाजूस पडलेल्या कुर्हाडीने हितेशच्या गळ्यावर व मानेवर घाव घालून त्यांचे धड व शीर वेगळे केले. त्यानंतर हितेशच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी सर्वांनी मिळून मृतदेह व शीर हे वेगवेगळ्या गोणपटात टाकून त्यास तारेने बांधून स्विफ्ट कारममधून सायखेडा गावातील गोदावरी नदीवरील पुलावरून मृतदेह व शीर नदीत फेकून दिल्याची कबुली दिली.
यांना झाली अटक
याप्रकरणी संशयित शरद वसंत शिंदे (३३, रा. खेरवाडी शिवार, ता. निफाड) आलीम लतीफ शेख (वय २०, रा. खेरवाडी, ता. निफाड, दोघे मूळ रा. मानोली, ता. मानवत, जि. परभणी) जगदीश भास्कर संगमनेरे (वय ५३), संदिप भास्कर संगमनेरे (वय ४५), योगेश जगदीश संगमनेरे (वय २४, तिघे रा. खेरवाडी- ओझर रोड, शिवांजली नगर, खेरवाडी, ता. निफाड) यांना अटक करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक पप्पू कादरी यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तपास करीत आहे.
२५ हजार रुपयांचे बक्षीस
या गुन्ह्याच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक पप्पू कादरी, पोलीस उपनिरीक्षक विजय गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार जालिंदर खराटे, पोलीस नाईक विश्वनाथ काकड, सुशांत मरकड, प्रितम लोखंडे, हेमंत गिलबिले, रवींद्र टर्ले, सचिन पिंगळ, कपालेश्वर ढिकले, नवनाथ वाघमोडे, प्रदीप बहिरम, हेमंत गरुड, किरण काकड यांच्या पथकाने कामगिरी बजावली आहे. पोलीस पथकाने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेवून पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी तपास पथकास २५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले.