योगेश सगर, इंडिया दर्पण वृत्तसेवा
निफाड तालुक्यातील म्हाळसाकोरे येथे नरभक्षक बिबट्याला मंगळवारी जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. हा मादी बिबट्या तीन ते चार वर्षाचा असल्याची माहिती वनविभागाने दिली. म्हाळसाकोरे येथे आई बरोबर जाणाऱ्या रोहन ठाकरे या सात वर्षाच्या बालकाचा बळी बिबट्याने घेतला होता. ज्या ठिकाणी घटना घडली त्या घटनास्थळापासून अगदी थोड्या अंतरावर शिवराम मुरकुटे यांच्या शेतात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात आलेला होता. याच ठिकाणी हा बिबट्या जेरबंद झाल्यानंतर वन विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक सुजित नेवसे, वनपरिक्षेत्र अधिकारी अक्षय मेहेत्रे, वनपाल भगवान जाधव, वनरक्षक पंकज नागापुरे यांच्यासह वनविभागाचे पथक म्हाळसाकरे येथे पोहोचले. बिबट्याला वनविभागाच्या वाहनातून निफाड येथील वनविभागाच्या रोपवाटिका केंद्रात आणण्यात आले. या ठिकाणी तालुका लघुपशुवैद्यकीय सर्वचिकित्सालयाचे सहाय्यक आयुक्त डॉ. रवींद्र चांदोरे यांनी या बिबट्याची वैद्यकीय तपासणी केली.