निफाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील वनसगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे समुदाय आरोग्य अधिकारी पदावर कार्यरत असणारे डॉ कलीम पठाण यांनी दिवाळीनिमित्त आपल्या सहकाऱ्यांसोबत वनसगाव-ब्राह्मणगाव रस्त्यावरील वस्त्यांवर लहान मुलांना नवीन कपडे, फराळ, आणि फटाके वाटत होते. यातच एका झोपडीत शिरल्यानंतर डॉ. पठाण यांनी दिपाली महाले (वय २४) गरोदर स्त्रीला विव्हळताना पाहिले, यावेळी त्यांनी १०८ रुग्णवाहिकेला फोन करून याबद्दल माहिती दिली, रुग्णवाहिका येण्यासाठी वेळ लागणार होता तेव्हा डॉ. कलीम पठाण यांनी डिलिव्हरी करण्याचा निर्णय घेतला. डिलिव्हरी झाल्यानंतर या मातेने एका गोंडस बाळाला जन्म दिला खरा परंतु बाळ जन्मल्यानंतर त्याची कोणतीही हालचाल नव्हती या बाळाच्या गळ्यात नाळेचा वेढा अडकल्याने बाळाचा श्वासोच्छ्वास काही काळ बंद झाला होता तेव्हा डॉ पठाण यांनी कृत्रिम श्वासोच्छ्वास देत सिपीआर देत बाळाचे प्राण वाचवले, तेव्हा सगळ्यांनाच आनंद झाला. यानंतर बाळ आणि माता यांना उपजिल्हा रुग्णालय निफाड येथे डॉ कलीम पठाण यांनी संदर्भित केले डॉ कलीम पठाण आरोग्य सेवक गोरक्षनाथ ताजणे, आशा कार्यकर्ती सविता कोकाटे यांच्याकडून माणुसकीचे अनोखं दर्शन घडल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय.
अन् बाळालाही घातला नवीन ड्रेस
डॉ. कलीम पठाण आणि त्यांचे सहकारी मित्र हे ब्राह्मणगाव येथील वस्तीवर असणाऱ्या मुलांना दिवाळी निमित्त नवीन कपडे, फराळ आणि फटाके घेवून गेले होते अशातच या बाळाचा जन्म झाल्याने त्यांनी आणलेल्या नवीन कपड्यांपैकी एक ड्रेस लगेच बाळाला घातला.