लासलगाव – द्राक्ष खरेदीच्या मोबदल्यात दिलेला धनादेश न वटल्याप्रकरणी न्यायालयात दाखल झालेल्या फौजदारी खटल्यात सबळ पुराव्याअभावी द्राक्ष व्यापारी विकास प्रल्हाद पिसे यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. विकास प्रल्हाद पिसे रा.पिंपळगाव (ब.) यांचे विरुद्ध निफाड येथील अति. मुख्य न्यायदंडाधिकारी यांचे न्यायालयात नांदुर्डी, ता.निफाड येथील शेतक-याने त्यास दिलेला रुपये १,६६,२०० रुपयाचा धनादेश न वटल्याचे कारणाने फौजदारी खटला दाखल केला होता.
नांदुर्डी येथील शेतक-याने विकास प्रल्हाद पिसे या द्राक्ष व्यापाऱ्यास मार्च २०१९ मध्ये त्याचे शेतातील द्राक्ष माल विक्री केला व त्याचे किमतीची रक्कम द्राक्ष उत्पादक शेतक-यास मिळावी म्हणून द्राक्ष व्यापाऱ्याने वरील रक्कमेचा चेक त्यास दिला होता, परंतु, सदरचा चेक फिर्यादी शेतक-याचे बँकेचे खात्यात वटणेसाठी टाकला असता तो चेक वटला नाही म्हणून फिर्यादी शेतक-याने आरोपी द्राक्ष व्यापारी याचे विरुद्ध निगोशिएबल इंस्तृमेंट कायदा, कलम-१३८ अन्वये समरी क्रिमीनल केस नं. ५१५/२०१९ ची दाखल केली होती. त्यात उभयपक्षाचा साक्षीपुरावा लक्षात घेऊन आरोपी विकास पिसे याने दिलेला चेक हा फिर्यादीचे कायदेशीर घेणेपोटी दिला असल्याचे फिर्यादी सिद्ध करू शकला नाही म्हणून आरोपी विकास पिसे यास निफाड न्यायालयातील अति.मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती.एम.एस.कोचर यांनी निर्दोष मुक्त केले आहे. या खटल्यात आरोपी तर्फे अॅड .समीर भोसले यांनी कामकाज पाहिले.