दीपक श्रीवास्तव
निफाड – निफाड तालुक्यातील ओझर, पिंपळगाव, लासलगाव, यांच्या तुलनेने निफाड शहराला व्यापार धंदा निमित्त होणारी लोकांची वर्दळ कमी असली तरी दर शुक्रवारी भरणारा मोठा आठवडे बाजार, दैनंदिन बाजार, जिल्हा न्यायालय, प्रांत कार्यालय, तहसील कार्यालय, उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय अशा महत्त्वपूर्ण शासकीय कार्यालयांमुळे तसेच शैक्षणिक संस्थांमुळे निफाड शहरामध्ये बाहेरून येणाऱ्या लोकांची ये-जा मोठ्या प्रमाणात बघायला मिळते. आठवडे बाजाराच्या दिवशी किमान पंधरा ते वीस हजार लोकांची गर्दी निफाडला होते तर शासकीय व इतर कामानिमित्त दिवसाकाठी किमान पाच ते सहा हजार लोक येथे येत असतात. निफाड ची लोकसंख्या आज सुमारे तीस हजार पर्यंत जाऊन पोहोचलेली आहे. इतक्या मोठ्या लोकसंख्येच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविणे हे नगरपंचायती समोरील सर्वात मोठे आव्हान आहे.
निफाड शहराला कादवा आणि वडाळी या दोन नद्यांचा सहवास लाभला असून गोदावरी नदी देखील अतिशय जवळून वाहते. नांदूर मधमेश्वर धरणाचे बॅक वॉटर निफाड पर्यंत येत असल्याने इतर गावांना किंवा शहरांना जसा पाण्याचा प्रश्न भेडसावतो तशी गंभीर वेळ निफाड वर कधीच येत नाही.परंतु पाणी भरपूर असले तरी प्रदूषणामुळे पिण्यासाठी ते धोकादायकच म्हणायला हवे. निफाड येथील सार्वजनिक नळ पाणीपुरवठा योजना साधारण १९७० च्या आधीपासून अस्तित्वात आलेली आहे. त्या काळात टाकण्यात आलेली पाईप लाईन अजूनही वापरत आणली जात आहे. ही पाईपलाईन जुनी असल्याने पाणीगळतीचा सामना नगरपालिकेला सतत करावा लागतो.
आजच्या घडीला निफाड शहरात पाणीपुरवठ्यासाठी दोन लाख लिटर पाणी शुद्ध करेल इतक्या क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वितअसून सात लाख लिटर क्षमतेचे तीन जलकुंभ उभारण्यात आलेले आहेत. शहरातील एक जलकुंभ निकामी झाल्यामुळे चार प्रभागांना थेट जलशुद्धीकरण प्रकल्पातून पाणीपुरवठा करण्यात येतो.
निफाड नगरपंचायतीचे प्रथम नगराध्यक्ष राजाभाऊ शेलार, विद्यमान नगराध्यक्षा सौ. रूपाली रंधवे, उपनगराध्यक्ष अनिल पा. कुंदे, मुख्याअधिकारी डॉ.श्रीया देवचके, अभियंता भालचंद्र क्षीरसागर आणि सर्व सदस्य, नगरसेवक यांच्या समन्वयातून शहराचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न नियंत्रणात ठेवण्यात स्थानिक प्रशासनाला यश आलेले आहे.
निफाड शहराच्या पाणी पुरवठ्या मध्ये अडचण निर्माण होण्याचे मुख्य कारण म्हणजे वारंवार खंडित होणारा आणि कमी दाबाने होणारा वीजपुरवठा. वीज पुरवठ्याअभावी एक दिवस जरी पाणीपुरवठ्याचे नियोजन बिघडले तर ते सुरळीत करण्याकरता किमान चार ते पाच दिवसांचा अवधी लागतो त्यामुळे वीज पुरवठा व्यवस्थित झाला तर पाणी पुरवठ्याचे अडचण येणार नाही असे प्रशासनाचे म्हणणे आहे. शहरातील पाणीपुरवठ्याची यंत्रणा खूप जुनाट झाल्या असल्यामुळे वारंवार लिकेजची समस्या निर्माण होत असते मात्र नगरपंचायत चे सर्व कर्मचारी तातडीने त्यातून मार्ग काढतात. जुनी यंत्रणा संपूर्ण काढून नवीन पाईपलाईन टाकणे हाच त्याच्यावर कायमस्वरूपी इलाज ठरू शकतो.
नाशिक शहर व औद्योगिक वसाहतीचे रासायनिक सांडपाणी गोदावरी नदीत मिळत असल्याने जल प्रदूषणाचा सामना देखील निफाड नगरपालिकेला करावा लागतो. काही प्रसंगी जलस्त्रोतांमध्ये पाण्याची उपलब्धता कमी असेल तर खाजगी विहिरी मधून देखील पाणी घेऊन ते नागरिकांना उपलब्ध करून दिले जाते. यासाठी अनिल पाटील कुंदे, भाऊसाहेब कापसे, अंबादास भाऊ गोळे, एडवोकेट जंगम, बाळासाहेब गोसावी असे अनेक नागरिक गरजेनुसार मदतीसाठी पुढे येत असतात.
निफाड शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या भविष्यकालीन नियोजनाची माहिती देताना अनिल पाटील कुंदे आणि डॉ. श्रीया देवचके यांनी सांगितले की, सध्या निफाड शहरातील अस्तित्वात असलेली पाणी पुरवठ्याची यंत्रणा ही कालबाह्य झालेली असून आगामी वीस वर्षांतील लोकसंख्या वाढ व शहराचा विस्तार लक्षात घेऊन पाणीपुरवठ्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. २०१२-१३ च्या सुमारास कुरडगाव ते निफाड अशी एक स्वतंत्र जलवाहिनी टाकण्याचा प्रस्ताव होता मात्र गोदावरीतील प्रचंड जलप्रदूषणामुळे ही योजना थांबविण्यात आली त्याऐवजी पर्याय म्हणून पालखेड धरणातून थेट निफाड शहराला पाणी पुरवठा करण्याची योजना पुढे आली. ४८ कोटी रुपये खर्चाची ही योजना असून या योजनेचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून पाण्याचे आरक्षण सुद्धा निश्चित करण्यात आलेले आहे. धरणातून पाणी उपसा करण्यासाठी जॅकवेल व इतर गोष्टींसाठी तांत्रिक मंजुरी प्रलंबित आहे. महाराष्ट्र राज्य सुवर्ण जयंती नगर उत्थान योजने अंतर्गत यासाठी अर्थसंकल्पीय तरतूद देखील करण्यात आलेली आहे. तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर चार वर्षात ही संपूर्ण योजना पूर्ण करण्याचे नियोजन आहे. सदर योजनेनुसार निफाडकरांना दररोज २४ तास प्रतिमाणसी १३५ लिटर शुद्ध पाण्याचा पुरवठा होऊ शकेल. नागरिकांकडून पाण्याचा अपव्यय होऊ नये यासाठी प्रत्येक नळजोडणी ला इन्फ्रारेड मीटर ची व्यवस्था करण्यात येणार असून पाणीगळती टाळण्यासाठी शहरातील सर्वत्र नविन जलवाहिन्यांचे जाळे तयार केले जाणार आहे.