निफाड – तालुक्यातील भेंडाळी येथे दरोडा घालण्याच्या उद्देशाने दडून बसलेल्या टोळीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार मध्यरात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास निफाड तालुक्यातील भेंडाळी शिवारामध्ये आडरस्त्यावर काही संशयित इसम दरोडा घालण्याच्या उद्देशाने दडून बसण्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि सायखेडा पोलीस ठाणे यांनी संयुक्त कारवाई करीत तातडीने हालचाल करून शोध घेतला असता सिन्नर निफाड मार्गावरील भेंडाळी शिवारामध्ये पांढऱ्या रंगाच्या कार जवळ काही इसम संशयास्पद हालचाली करीत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता रात्रीच्या अंधाराचा गैरफायदा घेऊन पाच जणांच्या टोळीतील तीन संशयित हे पळून जाण्यात यशस्वी झाले तर दोन जणांना पोलिसांनी चपळाईने ताब्यात घेतले. संशयितांकडे असलेल्या पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये चंदनाच्या झाडाचे कापलेले तुकडे, मिरचीची भुकटी, धारदार शस्त्रे आढळून आली. पोलिसांनी ताब्यात घेतलेले आरोपी हे अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील राहणारे असून भावड्या उर्फ विजय लक्ष्मण मुर्गे, भगवत राधाकिसन तांदळे, अविनाश विजय मुर्गे व अन्य दोन अशी या संस्थेत यांची नावे आहेत. संशयित आरोपींविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.