लासलगाव – निफाड तालुक्यातील उत्तर-पूर्व पट्ट्यातील असणाऱ्या नांदुर्डी गावातील किशोर गंगाराम शिंदे वय( ३३) हा तरुण अमृतसर येथे बीएसएफ अर्थात सीमा सुरक्षा दलात कार्यरत असताना मंगळवारी दुपारी या वीर जवानाला अपघाती वीर मरण आले आहे. या घटनेने नादुंर्डी गावावर शोककळा तर शिंदे कुंटूबावर या अचानक आलेल्या प्रसंगाने दुःखाचे गडद सावट पसरले आहे. पत्नी काजल व दीड वर्षाच्या मुलगी वेदिकासह अमृतसर येथील बीएसएफच्या कॅम्पमध्ये राहत होता. नांदुर्डी येथे रासाका येथे कार्यरत असणारे साखर कामगार वडील गंधाधर केदु शिंदे, आई अनुसया गंगाधर शिंदे, लहान भाऊ संकेत गंगाधर शिंदे असा परिवार आहे. घरात मोठा असल्याने घरातील कर्ता पुरूष गेल्याने परिवाराला धक्का बसला आहे. या घटनेचे वृत्त कळताच नादुंर्डीसह परिसरातील नागरिकांनी त्यांच्या घरी गर्दी करून शिंदे कुटुंबाचे सांत्वन केले. या घटनेनंतर आता किशोर शिंदे यांचे पार्थिव हे अमृतसर येथून दिल्लीला विमानाने आणण्यात आले आहे. तेथून मोटारीने त्यांचे पार्थिव घेऊन बीएसएफचे जवान हे नादुंर्डी कडे रवाना झाल्याची माहिती निफाडचे तहसीलदार शरद घोरपडे यांनी दिली आहे.