निफाड – तालुक्यातील सारोळे खुर्द येथे किरकोळ कारणावरून दोन मित्रांमध्ये झालेल्या वादाचे पर्यावसान एका तरुणाने दुसऱ्या तरुणाची हत्या करण्यामध्ये झाले. याबाबत निफाड पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार निफाड तालुक्यातील सारोळे खुर्द येथील बरड वस्ती मध्ये ४ मार्च रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास विलास अजय पवार उर्फ दिघू आणि योगेश रमेश नावत्रे या दोन तरुणांमध्ये किरकोळ कारणावरून वाद सुरू झाला. या भांडणांमध्ये राग अनावर होऊन योगेश नावत्रे या वीस वर्षीय तरुणाने द्राक्ष बागेतील कामात वापरल्या जाणाऱ्या धारदार कात्रीने विलास अजय पवार या २२ वर्षीय तरुणावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यामध्ये विलासच्या गळ्यावर प्राणघातक वार झाल्याने त्याचा मृत्यू ओढवला. आरोपी योगेश तात्काळ घटनास्थळावरून पसार झाला. या घटनेची खबर मयत विलास यांचे वडील अजय पवार यांनी निफाड पोलीस ठाण्याला दिली.
जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे, उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने सूत्रे हलवून पोलिसांनी आरोपी योगेश नावत्रे याला जेरबंद करण्यात यश मिळवले. याप्रकरणी निफाड पोलिसांनी भादवि कलम ३०२ व ५०४ अन्वये गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक आर बी सानप, सहाय्यक पोलीस निरीक्षक एकनाथ ढोबळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विश्वनाथ निकम, व पोलीस कर्मचारी मनोज आहेर, संदीप निचळ, नितीन सांगळे, विलास बिडगर, विकास जाधव आदी अधिक तपास करीत आहेत.