निफाड – तालुक्यातील चांदोरी येथील प्रगतशील शेतकरी नितीन वसंत गडाख, सचिन वसंत गडाख व त्यांची आई ताराबाई वसंत गडाख यांचे बेदम मारहाणीच्या खटल्यातून निर्देोष मुक्तता करण्यात आली आहे. हा खटला निफाड येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती.एम. एस.कोचर यांचे न्यायालयात चालला. सदर खटल्यात सरकार पक्षाने सात साक्षीदार तपासले, परंतु सबळ पुराव्याअभावी आरोपी गडाख कुटुंबीयांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.
गडाख यांच्या लगतचे शेतकरी यांचेबरोबर शेतीच्या रस्त्यावरून वाद होता. त्या वादामुळे सदर गडाख कुटुंबीयांचे द्राक्ष वाहतुकीस हरकत केली म्हणून त्यांनी त्यांचे लगतचे शेतकरी व त्यांच्या कुटुंबियांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली व फिर्यादीला फावड्याचे दांड्याने मारहाण करून त्याचा एक हात व एक पायाचे हाड मोडले अशा प्रकारची तक्रार या गडाख कुटुंबीयांचे विरुद्ध त्यांचे लगतचे शेजाऱ्याने निफाड पोलिसांकडे दिली होती. त्यावरून गडाख कुटुंबीयांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावरून निफाड पोलिस ठाण्यात गडाख कुटुंबियांचे विरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. या खटल्यात आरोपीतर्फे ॲड.अण्णासाहेब भोसले यांनी काम पाहिले त्यांना ॲड. उत्तम कदम व ॲड. समीर भोसले यांनी सहकार्य केले.