निफाड – निफाड तालुक्यातील चांदोरी येथील एका लॉन्समध्ये बनावट देशी दारुचा कारखाना उद्ध्वस्त केल्याच्या घटनेला काही तास उलटत नाही तोच, उत्पादन शुल्क विभागाने सायखेड्यातही अशीच एक कारवाई करत ५० लाखांचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान, कारवाई झालेल्या दोन्हीही कारखाने हे वाहतुक सेनेचे पदाधिकारी संजय दाते यांचे असून, ग्रामीण पोलिसांनी त्यांना चांदोरीतील कारवाईत ताब्यात घेतले आहे.
निफाड तालुक्यातील नाशिक-औरंगाबाद राज्य मार्गावर असलेल्या चांदोरी शिवारात उदय राजे लॉन्समध्ये अवैधरित्या सुरू असलेला बनावट देशी दारूचा कारखाना नाशिक ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला. सोमवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास केलेल्या या कारवाईत सुमारे एक कोटीच्या मुद्देमाल हस्तगत करण्यात आला होता. या कारवाईनंतर लगेचच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक मनोहर अंजुळे यांना मिळालेल्या माहितीवरुन उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सायखेड्यात छापा टाकला. दरम्यान, धुळ्यातील गुन्हेगार उर्फ दिनू डॉन हा बनावट दारू प्रकरणातला मुख्य सूत्रधार असल्याचं पुढे आलंय. त्याच्यावर मोक्का अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई झालेली आहे.
५० लाखांचा मुद्देमाल हस्तगत
मिळालेल्या माहितीवरुन आम्ही हा छापा टाकला. त्यात स्पिरीट, बाटल्यांची झाकणं, बॅरल्स असा सुमारे ५० लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याप्रकरणात दिनेश गायकवाड उर्फ दिनू डॉन या प्रमुख सशयिताचे नाव पुढे आले आहे. तो धुळ्याचा असून, त्याच्यावर धुळ्यात मोक्कान्वये स्थानबद्धतेची कारवाईदेखील झालेली आहे.
– मनोहर अंचुळे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, नाशिक