निफाड – निफाड तालुक्यातील चांदोरी येथील उदयराजे लॉन्स मध्ये बनावट दारूच्या कारखान्यावर पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी पथकासह धाड टाकत हा अड्डा उदध्वस्त केला. सोमवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षकांनी एकवीस जणांच्या पथकासह धाड टाकत सुमारे एक कोटींचा माल जप्त केला आहे. लग्न मंडपाच्या सभागृहात चारी बाजूने ताडपत्री व पत्र्याच्या साहाय्याने बंदिस्त करत आत मध्ये बारा ते पंधरा जणांचे समूह स्पिरिटच्या साहाय्याने रात्रीच्या वेळेस सर्व प्रकारच्या देशी दारू बनवण्याचे काम सुरू होते. अशातच पोलीस अधीक्षक यांनी ताफ्यासह धाड मारली. या कारवाईत सहायक पोलिस निरीक्षक मयूर भामरे,संजय पाटील,प्रभाकर पवार,ज्ञानदेव शिरोळे,मुनिर सय्यद,शामराव गडाख,बंडू ठाकरे,नितीन मंडलिक, हनुमंत महाले,प्रकाश तुपलोंढे, भगवंत निकम,गणेश वराडे,नंदू काळे,विश्वनाथ काकड,सागर काकड,सतीश जगताप,मंगेश गोसावी,सुशांत मरकड,रवींद्र टरले, प्रीतम लोखंडे,किरण काकड,भूषण उन्हावणे,नौशाद शेख यांनी कारवाईत सहभाग घेतला.
रात्रीस खेळ चाले
सदर घटनास्थळ हे मंगल कार्यालयासाठी असताना येथे मुख्य व्यासपीठावर बनावट बॉक्स रचलेले होते तर पाहुणे व जेवणावळीच्या ठिकाणी मात्र स्पिरीट व बनावट दारूचे अंदाजे नऊशे ते हजार बॉक्स तयार मालाचे आढळून आले.त्याच प्रमाणे हुबेहूब रिकामे बुच,माल बनवण्याचे साहित्य,रिकाम्या बाटल्या व बनावट मद्य बनवण्याचे इतर साहित्य आढळून आले. सदरचे काम हे रात्रीस खेळ चाले प्रमाणे होते.दिवसा कुणालाही काहीच थांगपत्ता लागत नसे परंतु अंधार पडल्यानंतर सर्व पॅकिंग साहित्य रचून हा उद्योग सुरू होता.यामध्ये बाजारातील हुबेहूब पॅकिंग व लेबल साहित्य बघून सर्वच जण चक्रावले.ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई समजली जाते आहे.रात्री उशिरापर्यंत गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू होते.