निफाड – तालुक्यातील उगाव येथील कीटकनाशक औषध विक्रेत्याने शेतकऱ्यांना उधारी वसुलीसाठी भाडोत्री गुंडांचा वापर करत फोनवर गलिच्छ भाषेत शिवीगाळ करत अपहरण करण्याची धमकी देण्याचा प्रकार घडल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान या प्रकरणात गुन्हा दाखल झाला असून हा कीटकनाशक औषध केंद्राच्या संचालिका पतीसह फरार झाल्याचे समोर आले आहे.
भारतीय स्वातंत्र्याचा उत्सव देशभर सुरू असताना जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांना अशा प्रकारे गुंडांकडून धमकावल्या मुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी संबंधीत विक्रेत्या विरुद्ध निफाड पोलीस ठाण्यात धडक मोर्चा नेऊन कायदेशीर कारवाईची मागणी केली. आधीच शेतकरी हा आर्थिक संकटाने बेजार झालेला आहे, त्यातच संबंधित कृषी विक्रेताने दिलेल्या धमक्यांमुळे शेतकऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली. निफाड तहसील व पोलीस ठाणे कार्यालयात उगावसह पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी एकत्र येउन प्रांताधिकारी डॉ. अर्चना पठारे, उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ तांबे, तहसलिदार शरद घोरपडे यांना निवेदन देत आरोपींवर लवकरात लवकर कारवाई करावी व त्यांना गावातुन हद्दपार करावे अशी मागणी केली. याप्रसंगी नगरसेवक अनिल पाटील कुंदे, पंचायत समितीचे माजी सभापती सोमनाथ पानगव्हाणे, निफाड शेतकरी संघाचे अध्यक्ष राजेंद्र डोखळे, तसेच सर्वश्री छोटूकाका पानगव्हाणे, संजय वाबळे, मधुकर ढोमसे, भास्करराव पानगव्हाणे, केदु पानगव्हाणे, साहेबराव ढोमसे, साहेबराव पानगव्हाणे, संदिप पानगव्हाणे, दतु सुडके, सदुमामा आहेर, मधुकर गवळी, परसराम तात्या पानगव्हाणे, शिवसेना ज्येष्ठ नेते प्रभाकर मापारी, पतिंग ढोमसे, अबांदास पानगव्हाणे, आदींसह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला.