निफाड – गत दोन वर्षांपासून कोविडच्या प्रादुर्भावाने व नैसर्गिक आपत्तीमुळे निफाड तालुक्यासह नाशिक जिल्ह्यातील शेतकरी आपला शेतीमाल कवडीमोल भावाने विकत आहे. त्यातच भर म्हणून नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकऱ्यांकडे सक्तीची कर्जवसुली चालविली आहे. या सक्तीच्या कर्जवसुलीला स्थगिती मिळविण्यासाठी निफाडचे माजी आमदार अनिल कदम यांनी मंगळवारी सायंकाळी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांची भेट घेऊन साकडे घातले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना निवेदन दिले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या निवेदनात अनिल कदम यांनी म्हटले आहे की, निफाड तालुक्यासह नाशिक जिल्ह्यातील शेतकरी अस्मानी सुलतानी संकटामुळे आर्थिक विवंचनेत सापडल्याने हलाखीत जीवन जगत आहे. अवकाळी पावसामुळेही ठीकठिकाणी शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तरीही जिल्हा बँकेकडून सक्तीने कर्जवसुली मोहीम राबविली जात आहे. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले असून वसुलीसाठी स्थगिती न दिल्यास नाशिक जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या वाढू शकतात, अशी भीतीही कदम यांनी आपल्या निवेदनात व्यक्त केली आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी जिल्हा बँकेकडून माहिती घेऊन सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन अनिल कदम यांना दिले. तसेच निफाड तालुक्यातील चोवीस गावांचा पाणी पुरवठा योजना राबविण्यासाठी जलजीवन मिशन कृती आराखड्यात समावेश करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी सहकार्य केल्याबद्दल अनिल कदम यांनी त्यांचे विशेष आभार यावेळी मानले. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी कर्जवसुली स्थगिती निवेदन देण्यावेळी माजी आमदार अनिल कदम यांच्या समवेत बाजार समिती संचालक गोकुळ गीते, बाळासाहेब सरोदे, अमोल भालेराव आदी उपस्थित होते.