सुदर्शन सारडा, ओझर
बारा दिवसांवर येऊन ठेपलेल्या मतांच्या रणसंग्रामात प्रचार शिगेला पोहोचला असताना निफाड मध्ये मात्र प्रमुख तीन उमेदवार ताई माई आक्काचा जागर करत प्रचार करत आहे. सध्या निफाडमध्ये प्रचार शिगेला पोहोचला असून गावनिहाय, गट निहाय प्रचार बैठकांनी जोर धरला आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर मिळालेल्या कालावधीत ८८ गावं कव्हर करण्याचं उद्दिष्ट लक्षात घेऊन प्रचार कार्यक्रम जोमात सुरू आहे.
माघारीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर महायुती कडून दिलीप बनकर,महाविकास आघाडीकडून अनिल कदम तर प्रहारकडून गुरुदेव कांदे यांच्यासह इतर पक्ष अपक्ष उमेदवार रिंगणात आहे. काकांचा अजेंडा हा दादांचा वादा असला तरी भाजपने आपली ताकद बनकर यांच्या पाठीशी उभी केली आहे. शिंदे गटाची पाहिजे तेवढी ताकद तालुक्यावर नसली तरी जे पदाधिकारी आहेत ते तन मन धनाने प्रचारात सहभागी झाले आहे. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर सर्वात कमी फटका हा निफाडमध्ये बसला त्यामुळे महाविकास आघाडी कडून रिंगणात असलेले अनिल कदम यांच्या पाठीशी काही नेते वगळता बहुतांश शिवसैनिक प्रचारात सहभागी झाले आहे.
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट ही जोमाने कामाला लागला आहे. तालुक्यात शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग असल्याचे गत तीन दशकांच्या विधानसभा आकडेवारीतून स्पष्ट दिसत आले आहे. अशातच बनकर यांनी केलेली व्यूहरचना पाहता कदम यांनीही आपली विशिष्ठ मोडस ऑप्रेंडी रचली आहे.या दोन बिग फाईट मध्ये प्रहार कडून गुरुदेव कांदे हे उमेदवारी करत आहे. गोदाकाठ भागात त्यांचे मूळ गाव असल्याने त्यांनीही प्रचारातून आपले हौसले बुलंद ठेवले आहे. तरुणांची फौज हीच आपल्या जमेची बाजू असल्याचे कांदे यांचे मत आहे.
राजकीय दृष्ट्या प्रगल्भ असलेला निफाड सध्या प्रचाराच्या शिगेत न्हाऊन निघाला असताना तीन उमेदवार अन् आश्वासन हजार हाच एकमेव कार्यक्रम सध्या पुढचे बारा दिवस राहील. पुढील आठवड्यापासून रात्र वैऱ्याची राहील त्याआधी दमछाक, खैरात आणि आश्वासन या अंतर्भावात मग्न होऊन तालुक्यातील नेते जोमाने हात जोडत आहे.कोण कसा सरस हे सांगताना वेळेचं बंधन आड येत असले तरी त्याला नियोजनाच्या कप्प्यात बसवण्याचा सराव देखील यानिमित्ताने घडून येत आहे. तूर्तास ताई-माई-अक्का विचार करा पक्का