योगेश सगर, निफाड
तालुक्यातील चांदोरी शिवारात नाठे यांच्या वस्तीवर आज दि 4 रविवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास ८० वर्षीय वृद्ध व्यक्ती विहिरीमध्ये पाय घसरून पडली. या व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी आणखी एक व्यक्तीने विहीरीत उडी मारली. अखेर दोघेही अडकले. चांदोरी येथील आपत्ती व्यवस्थापन पथकाने विशेष परीश्रम घेत या दोन्ही व्यक्तींना जीवदान दिले आहे. अवघ्या काही मिनिटात आपत्ती व्यवस्थापन पथकाने केलेल्या या बचाव कार्याची तालुकाभर कौतुक केले जात आहे.
चांदोरी येथील नाठे वस्तीवरील धोंडीराम भालचंद्र नाठे वय वर्षे ८० हे त्यांच्या घराजवळून जात होते. त्याचवेळी त्यांनी विहीर लक्षात न आल्याने ते पाय घसरुन विहिरीच्या पाण्यात पडले. त्यानंतर धोंडीराम नाठे यांनी मदतीसाठी आकांत फोडला. मोठमोठ्याने आवाज देऊ लागले. आरडा ओरड करू लागले. त्यांचा आवाज गणेश गोरख नाठे यांनी ऐकू येताच ते धावत गेले. त्यांनी विहिरीत आजोबांना वाचविण्यासाठी उडी घेतली. परंतु त्यांना पोहता येत नसल्याने त्यांनी मदतीसाठी आवाज दिले. अशा परिस्थितीत रोशन संजय टर्ले यांनी आवाज ऐकताच विहिरी जवळची परिस्थिती पाहून तत्काळ चांदोरी येथील आपत्ती व्यवस्थापन पथकाचे प्रमुख सागर गडाख यांच्याशी संपर्क साधला. आपत्ती व्यवस्थापन पथक काही क्षणातच घटनास्थळी दाखल झाले. पथक प्रमुख सागर गडाख, दौलत टरले, किरण वाघ, राजेंद्र टर्ले, विलास सूर्यवंशी, सुभाष फुलारे, संजय गायखे यांनी तत्काळ घटनास्थळी बचाव कार्य सुरू केले. दोघांना सुखरूप बाहेर काढून दोघांचे प्राण वाचवले. आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या ह्या तत्काळ बचाव कार्यामुळे चांदोरी आणि परिसरातून कौतुक व्यक्त केले जात आहे.
Niphad 2 Mans Rescue Operation in well
Nashik District