सुदर्शन सारडा
विधानसभेचे शनिवारी निकाल लागले यात निफाड मधून अनिल कदम यांचा पराभव करत दिलीप बनकर हे तिसऱ्यांदा विधी मंडळात पोहोचले.या दोघांपैकी जे कुणी निवडून गेले असते त्यांची ही तिसरी कारकिर्द ठरली असती आणि याच तिसऱ्या कारकिर्दीला दिलीप बनकर यांच्या नावाची मोहोर उमटली आणि अनिल कदम यांनी बनकर यांचा केलेल्या दोन वेळच्या पराभवाची परतफेड या निमित्ताने झाली.
याचा दुसरा अर्थ लावायचा म्हटलं तर सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत याच निफाडने भास्कर भगरे यांना भरभरून मते दिले ती आघाडी देखील कदम हे कायम ठेऊ शकले नाही. तसाच प्रत्यय २०१९ सालच्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत आला होता.त्यावेळी भारती पवारांना आघाडी दिलेल्या निफाडने नंतर विरोधी उमेदवार असलेल्या दिलीप बनकर यांच्या पारड्यात मते देऊन त्यांना आमदार केले. याचाच अर्थ दिल्ली आणि मुंबईच्या निवडणुकीत इथला मतदार हा परिवर्तनवादी म्हणून ओळखला जातो.
दोन दिवसांपूर्वी अतिशय निकराची वाटणारी लढाई ही एकतर्फी झाली. अनिल कदम हे पराभूत झाले. त्यांनी पाच वर्षांपासून सुरू केलेल्या पूर्वतयारीने त्यांच्या मतांमध्ये १३ हजारांची वाढ झाली पण निफाडचा वाढलेला टक्का पुन्हा बनकर यांच्या पारड्यात पडला. पंधराशे कोटींची कामे आणल्याचे सांगत बनकर यांनी विकासावर मते मागितली खरी पण लाडकी बहीण आणि हिंदुत्व या दोन बाबी त्यांना बाय वन गेट टू फ्री सारख्या आपसूक मिळून गेल्याने वातावरण पुन्हा महायुतीकडे झुकले. दुसरीकडे अनिल कदम हे निष्ठा आणि विचारांवर मैदानात उतरले होते. निफाड हा सेनेचा बालेकिल्ला हे चार वेळेला सिद्ध होऊन गेले असताना त्याला यंदा खो बसून गेला. बळीराजा संघर्ष यात्रा पासून घोडामैदान सजवलेल्या कदम यांनी केलेला विजयाचा दावा अखेरपर्यंत कायम होता. पण मतदारांचा अंडर करंट त्यांच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात न आल्याने ओझर या कदमांच्या बालेकिल्ल्यात त्यांना केवळ तीन हजारांची आघाडी मिळाली हाच खरा अभ्यासाचा मुद्दा आहे.
तालुक्यातील एकूण २७८ बूथ मधून जवळपास दोनशे बूथ वर बनकर यांनी आघाडी घेतली. एकूणच विकास विचार आणि शेवटी घडलेल्या लक्ष्मी दर्शनाने मतदारांची मात्र चांदी झाली पण हिंदुत्व हा शब्द जो घरोघरी रुजवला गेला. त्याचा थेट फटका कदम यांना बसला. दिलीप बनकर यांनी जी कामे तालुक्यात केली. त्याचेही स्वागत अनेक निःपक्ष मतदारांनी करत त्यांना मतदान केले. केवळ फलक लावलेले अनेक कामं आचारसंहितेच्या कात्रीत अडकल्याने अद्याप कुदळ बाकी असल्याने त्याबाबत तातडीने काम करावे लागेल. निसाका सुरू करणे, रानवड सुरळीत ठेवणे महत्वाचे आहे .सर्वात महत्वाचे म्हणजे ड्रायपोर्टला जमीन हस्तांतर होऊन वर्ष लोटले पण अद्याप पावेतो तो सुरू करण्यासाठी आणि त्यावर स्थानिक बेरोजगारीचा विचार झाला नसल्याचे चित्र कायम आहे.
विकास हा महत्वाचा घटक असला तरी त्याला शाश्वतपणाची पायाभरणी करणेही तितकेच महत्वाचे आहे. बनकर यांना मिळालेल्या एकूण मतात त्यांच्या स्वभावाची दहा हजार मते आहेत.पण निकाल लागल्यावर आमदारकीचे लवलेश न दाखवता सामान्यपणा अंगीकारलेल्या दिलीप बनकर यांना आधुनिक विकासावरच लक्ष्य केंद्रित करावे लागेल तर कदम यांनाही स्वभावातला मूळ शिवसैनिकाचा स्वभाव पुन्हा ओठी आणावा लागेल.
आता प्रचार झाला,घोषणा झाल्या मतदान झाले, निकाल लागून गुलाल उधळला तो रविवारी उतरून पुन्हा जो तो त्याच्या कामाला लागला पण दिलेले शब्द मुहूर्त रूपात उतरवणे हे काम खऱ्याअर्थाने सुरू झाले यात कुणीही शंका घ्यायला नको म्हणून झाले इलेक्शन आता जपा रिलेशन!