विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली :
देशभरात अनेक राज्यात कोरोनाचे संकट कमी जास्त होत असतानाच निपाह विषाणूमुळे काल केरळमध्ये १२ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. त्यानंतर निपाह विषाणू संक्रमित मृताच्या संपर्कात आलेल्या १८८ नागरिकांची कॅान्टक्ट ट्रेसिंगव्दारे ओळख पटवण्यात आली. तर तब्बल १६८ जणांना आपापल्या घरात आयसोलेट करण्यात आले आहे. यातील २० जणांना अति धोक्याच्या शक्यतेमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे दोघेही आरोग्य कर्मचारी आहे. या विषाणूमुळे इतर राज्यांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
केरळमध्ये कोझिकोड जिल्ह्यात ३ सप्टेंबर रोजी निपाह विषाणूचा संशयित रुग्णाची नोंद करण्यात आली होती, यात १२ वर्षांच्या मुलामध्ये एन्सेफलायटीस आणि मायोकार्डिटिसची लक्षणे आढळली होती. मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचार सुरु असतानाच आज ५ सप्टेंबर रोजी सकाळी त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, केंद्र सरकारने नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल ( एनसीडीसी) कडून राज्याला तांत्रिक सहाय्य देण्यासाठी पाठवले आहे.
वटवाघळांद्वारे पसरत असावा
राज्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, निपाह विषाणू हा वटवाघळांपासून पसरला असावा, कारण या पूर्वी देखील राज्यात असे प्रकार घडले होते. वैद्यकिय तज्ज्ञांच्या मते, निपाह विषाणू प्रामुख्याने वटवाघळांद्वारे पसरतो. वटवाघळे फळे खातात आणि त्यांची लाळ फळावर सोडतात. अशी फळे खाणारे प्राणी किंवा मानव निपाह व्हायरसने संक्रमित होतात.