नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –गोव्यातील सीएसआयआर-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी (एनआयओ) च्या एका क्रांतिकारक अशा वैज्ञानिक अभ्यासामध्ये कृष्णा-गोदावरी (केजी) खोऱ्यात, बंगालच्या उपसागरात, एका पाण्याखालील भूस्खलनाची नोंद करण्यात आली आहे. ही घटना अपतटीय सागरी पायाभूत सुविधांना, पाण्याखालील संप्रेषण केबल्सना आणि किनारी भागातील समुदायांना धोका निर्माण करू शकते.
या आपत्तीजनक भूस्खलनाचा शोध टाईम-लॅप्स भूभौतिकीय डेटाच्या साहाय्याने लावण्यात आला असून, हा प्रकार या क्षेत्रातील सर्वांत मोठ्या पाण्याखालील भूस्खलनांपैकी एक मानला जात आहे. हा अभ्यास सखोल पाण्यातील भू-संकटांचे निरीक्षण करण्याचे महत्त्व अधोरेखित करतो.
हे भूस्खलन जानेवारी 2009 ते डिसेंबर 2015 दरम्यान घडले असल्याची शक्यता वर्तवली गेली आहे. यामुळे सुमारे 160 मीटर जाडीचा गाळाचा स्तर कमी झाला असून, सुमारे 11 किमी पदार्थ शेल्फ क्षेत्रातून विस्थापित झाले आहेत. या घटनेमुळे सुमारे 70 किमी क्षेत्र व्यापणारी, पंख्यासारखी “मास ट्रान्सपोर्ट डिपॉझिट ( एमटीडी)” तयार झाली आहे, जी 950 ते 1100 मीटर खोलीवर असून, तिची जास्तीत जास्त जाडी 60 मीटर आहे.
एनआयओ च्या शास्त्रज्ञांनी भूस्खलनाला कारणीभूत ठरलेल्या घटकांचा शोध घेण्यासाठी सखोल तपासणी केली. 2013 मध्ये आलेले सायक्लोन हेलन (श्रेणी-1 चक्रीवादळ) हा या घटनेतील महत्त्वाचा घटक असल्याचे समोर आले आहे. कारण चक्रीवादळाचा केंद्रबिंदू भूस्खलनाच्या भागावरून सरकला होता. 2010 आणि 2013 मधील प्रचंड पुराच्या घटना आणि मे 2014 मधील 6.0 तीव्रतेच्या भूकंपाचाही प्रभाव असू शकतो.
या संशोधनातून खोल पाण्यातील भू-संकटांमध्ये अवसादी घटकांचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. यामध्ये असे दिसून आले आहे की मध्यम तीव्रतेच्या घटकांमुळे, जसे की चक्रीवादळ किंवा स्थानिक भूकंपामुळेही, मोठ्या प्रमाणावर भूस्खलन होऊ शकते.
या संशोधनाने खंडीय काठावरील अस्थिर उतार भागांचे अधिकाधिक भूभौतिकीय सर्वेक्षण व निरीक्षण करण्याची आवश्यकता अधोरेखित केली आहे. या शोधाचा समुद्रावरील उद्योगांवर प्रभाव पडू शकतो, तसेच संभाव्य सुनामी निर्मिती व पायाभूत सुविधांच्या नुकसानीची शक्यता दर्शवली गेली आहे.