नाशिक – सिन्नरच्या मोहदरी घाटात राज्य शुल्क विभागाने जिल्ह्यातून अवैध मद्यसाठ्याची वाहतूक करणा-या नऊ जणांना अटक केली आहे. या ट्रकमध्ये परराज्यात विक्रीसाठी परवानगी असलेला मद्यसाठा दोन ट्रकमध्ये आढळला. त्यात ओल्ड बिल स्पेशल व्हिस्कीच्या ७५० मिलीच्या ३ हजार ६०० सिलबंद बाटल्या (३०० बॉक्स) आहेत. या कारवाईत अवैध मद्यसाठा, ट्रक, दोन कार असा ४० लाख २० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. नरेंद्रसिंग ऊर्फ नरेश राजेंद्रसिंग रोतेला, नारायण भगवान गिरी, सुनील रामचंद्र कांबळे, अजय सूर्यकांत कवठणकर, रवींद्र दत्तात्रय काशेगावकर, जतिन गुरुदास गावडे, सतीश संतोष कळगुटकर, सुभाष सखाराम गोदडे व अशोक बाबासाहेब गाडे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
राज्य शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, भरारी पथक एकचे निरीक्षक जयराम जाखरे यांना मद्याची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथक तयार करुन हा साफळा लावला. या पथकाने मोहदरी शिवारातील हॉटेल सूर्याच्या बाजूला वाहनांची तपासणी दरम्यान आयशर टेम्पोची संशयास्पद हालचाल दिसून आल्यानंतर टेम्पोची तपासणी केली. यात गोवा राज्यात विक्रीसाठी परवानगी असलेल्या मद्यसाठा या ट्रकमध्ये आढळून आला. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतिलाल उमाप, दक्षता पथकाचे संचालक सुनील चव्हाण, नाशिकचे विभागीय उपायुक्त अर्जुन ओहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली पथक एकचे निरीक्षक जयराम जाखर, दुय्यम निरीक्षक जी. पी. साबळे, रोहीत केरीपाळे, यशपाल पाटील, जवान सुनील दिघोळे, धनराज पवार, राहुल पवार, राजकुमार चव्हाणके, अनिता भांड यांच्या पथकाने सदरची कामगिरी केली.