मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक शहर आणि जिल्ह्यांतर्गत रुद्रा सिस्टिम एजन्सी ही वीजमीटर रिडिंग आणि वीज देयकांच्या वाटपाचे काम करीत असून जिल्ह्यातील १४ उपविभागांच्या कामात चुकीचे मीटर रिडिंग, रिडिंग न घेणे आदी कारणांकरिता जुलै ते ऑक्टोबर २०२१ या कालावधीत या एजन्सीला २३ लाख ८४ हजार २३९ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे, असे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले.
विधानसभा सदस्य ॲड. राहुल ढिकले यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना राज्यमंत्री श्री. तनपुरे यांनी सांगितले की, वेळोवेळी आदेश आणि सूचना देऊनही रुद्रा सिस्टिम एजन्सीच्या कार्यपद्धतीत सुधारणा न झाल्यामुळे पेठ उप विभागाच्या कामाचा कार्यादेश रद्द करण्यात आलेला आहे. अधीक्षक अभियंत्यांना अधिक तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
वस्त्रोद्योग विभागाला आठवडाभरात निधी देणार- उपमुख्यमंत्री
वस्त्रोद्योग विभागाकडे आठवडाभराच्या आत निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी सांगितले तर वस्त्रोद्योगमंत्र्यांबरोबर बैठक घेऊन या प्रश्नावरील तिढा सोडवू असे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सांगितले. यंत्रमागधारकांच्या निधीसंदर्भात आमदार प्रणिती शिंदे यांनी यासंदर्भात प्रश्न विचारला होता. वीजेच्या विषयावर सर्वंकष चर्चेचा प्रस्ताव सभागृहात मांडून सरकारचे धोरण जाहीर करणार असल्याचे संसदीय कार्यमंत्री ऍड. अनिल परब यांनी यावेळी सांगितले.