नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशकात आयटी प्रकल्प आणण्यासाठी जागतिक दर्जाच्या आयटी कंपनीशी बोलून एप्रिल मध्ये त्याची घोषणा होईल,असे प्रतिपादन दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे चेअरमन दीपक चंदे यांनी केली. औद्योगिक क्षेत्रात नाशिकला अव्वल क्रमांक मिळवून देण्याची नाशिककरांनी प्रतिज्ञा करावी,व निमा बरोबर हातात हात घालून त्यांच्या नेतृत्वात सर्व संघटनानी काम करायला पाहिजे असे आवाहनही चंदे यांनी यावेळी केले.
नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा)तर्फे त्रंबकरोडवरील ठक्कर इस्टेट येथे आयोजित निमा इंडेक्स- २०२४ या विराट प्रदर्शनाचे उद्घाटन शानदार सोहळ्याने झाले त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दीपक चंदे बोलत होते. व्यासपीठावर निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे, मुख्य अतिथी एचएएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी साकेत चतुर्वेदी,जिंदाल सॉचे चेअरमन व्ही चंद्रशेखरन. स्टेट बँक ऑफ इंडियाचे मुख्य व्यवस्थापक अमित कुमार, बँक ऑफ महाराष्ट्रचे क्षेत्रीय व्यवस्थापक सी.बी. सिंग बेदमुथा इंडस्ट्रीजचे विजय वेदमुथा, एसकेडीपीएलचे संजय देवरे,डीआयसीचे महाव्यवस्थापक संदीप पाटील, सह संचालक प्रमोद शेळके,एमआयडीसीचे प्रभारी प्रादेशिक अधिकारी जयवंत पवार,निमाचे सचिव निखिल पांचाळ, कोषाध्यक्ष राजेंद्र वडनेरे, सहसचिव मनिष रावल, आशिष नहार, राजेंद्र अहिरे आदी होते.
नाशिकसाठी हा सुवर्णकाळ आहे.समृद्धी मार्ग, विमानतळासह दळणवळणाच्या असलेल्या चांगल्या सोयी- सुविधा,जिंदाल आणि एचएएलसारख्या कंपन्यांच्या विस्तराच्या योजनांमुळे उद्योग क्षेत्रात नाशिकचे महत्त्व वाढले आहे.आगामी कुंभमेळा लक्षात घेऊन मंत्र्यांवर दबाव आणून व आयटी पार्कसह विविध विकासाची कामे करून घ्या.बँकांनीही उद्योजकांना सुलभपणे आणि विनाप्रयास कर्ज उपलब्ध करून द्यावे,असा सल्लाही चंदे यांनी यावेळी दिला.
एचएएलला नाशकात हवे गुड पार्टनर
धनंजय बेळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या अथक प्रयत्नांमुळे निमाने स्वतःला राष्ट्रीय स्तरावर सिद्ध केले आहे.एचएएलचे दोन प्रोजेक्ट लवकरच नाशकात येणार आहेत.त्यात नाशिकच्या उद्योजकांना त्यांचा शेअर नक्कीच मिळेल. एचएएलची टीम नाशकात येईल आणि गुड पार्टनर ते शोधतील,असे प्रतिपादन एचएएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी साकेत चतुर्वेदी यांनी केले. दर तीन महिन्यांनी एक बैठक घेऊन यासंदर्भात योग्य ती पावले उचलली जातील,असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. नाशिकचे हवामान चांगले आहे. नाशिकला सुंदर स्वच्छ आणि हरित करण्याची गरज असून उद्योग जगताने त्यादृष्टीने ठोस पावले उचलावीत,असे कळकळीचे आवाहनही त्यांनी केले. एचएएल विमानतळाला समांतर धावपट्टी तयार करणार आहे.उड्डाण सेवेत कोणताही खंड पडू नये हा त्या मागच्या खरे खरा उद्देश असल्याचेही चतुर्वेदी यांनी स्पष्ट केले.
जिंदाल सॉ नाशकात विस्तार करणार
सिन्नरमध्ये जिंदाल सॉचा प्रकल्प आहे.नाशिकमध्ये आणखी दोन ते तीन मेजर प्रोजेक्ट आणण्याचे संकेत जिंदल सॉचे चेअरमन व्ही.चंद्रशेखरन त्यांनी दिले.त्याबाबत जागेचा शोध सुरू असून मार्चमध्ये त्याची घोषणा करणार असेही व्ही.चंद्रशेखर यांनी आपल्या भाषणात पुढे सांगितले. हवामानासह सर्वदृष्टीने नाशिक येथे औद्योगिक विकासासाठी पोषक वातावरण असून मी सुद्धा नाशकात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला आहे,असे चंद्रशेखरन यांनी सांगतात टाळ्यांचा कडकडाट झाला होता.
स्वप्नवत प्रदर्शन यांचा आनंद- धनजंय बेळे
निमाला पुनर्वैभव प्राप्त करून देईन,असे आश्वासन मी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली तेव्हा दिली होती.अनेक आव्हाने पेलून आश्वासन पूर्ती झाल्याचे समाधान वेगळेच आहे. निमा इंडेक्स २४ हे माझ्या स्वप्नातले प्रदर्शन आहे असे मला वाटते,असे उद्गार निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी प्रस्ताविकात काढले. ५२५ हून अधिक उद्योजकांनी यात सहभाग नोंदवला आहे.नाशिकला गुंतवणुकीचा प्रवाह वाढावा हाच त्या मागचा खरा उद्देश आहे. रिलायन्सची ४००० कोटीची तर इंडिया ऑइलची ५०० कोटींची गुंतवणूक येथे होऊ घातली आहे. नवीन औद्योगिक वसाहतींसाठी जिल्ह्यात २००० एकर जागा तयार आहे.उद्योग विस्ताराचे नाशिक हेच नेक्स्ट डेस्टिनेशन असावे या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. एचएएलच्या विस्तारित योजनांमध्ये नाशिकचे जास्तीत जास्त वेंडर्स घेण्यात येतील अशी व्यवस्था करावी, अशी आग्रही मागणी बेळे यांनी यावेळी केली. नाशिकच्या विकासात भर घातल्याबद्दल बेळे यांनी जिंदाल सॉचे व्ही.चंद्रशेखर तसेच दीपक बिल्डर्सचे चेअरमन दीपक चंदे यांचा गौरवपूर्ण उल्लेख करीत चांदे यांनी आयटी पार्क उभरावे अशी आग्रही मागणी केली, व जिंदाल चे नविन प्रोजेक्ट नाशिकलाच आणावे हा आग्रह धरला, व शासनाशी सुरु असलेल्या चर्चे नुसार आगामी सहा महिन्यात नाशकात चार ते पाच हजार कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक येईल असा विश्वासही बेळे यांनी व्यक्त केला. आभार निमाचे सचिव निखिल पांचाळ यांनी मानले.
कार्यक्रमास निमाचे माजी अध्यक्ष आर.वेंकिटाचलम,विवेक गोगटे,मधुकर ब्राह्मणकर,आयमाचे अध्यक्ष ललित बूब, उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे,उमेश कोठावदे,सचिव प्रमोद वाघ, नाईसचे रमेश वैश्य, चेंबर ऑफ कॉमर्सचे संजय सोनवणे, लघुउद्योग भारतीचे निखिल तापडिया,क्रेडाईचे अध्यक्ष कुणाल पाटील,गौरव ठक्कर, बिपिन बटाविया,जे आर वाघ, एस एस आनंद,बॉशचे शालिग्राम, राजेंद्र कोठावदे,कैलास पाटील,नितीन आव्हाड,किरण वाजे,हेमंत खोंड,सुधीर बडगुजर,नानासाहेब देवरे, दिलीप वाघ,ललित सुराणा,सतीश कोठारी, हर्षद बेळे,विराज गडकरी, अखिल राठी, वागस्कर, किरण पाटील आदींसह कार्यकारणी सदस्य व उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.