नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मध्यप्रदेश सरकारतर्फे भोपाळ येथे २३ फेब्रुवारीपासून आयोजित जागतिक औद्योगिक गुंतवणूक समिटमध्ये नाशिकच्या ब्रॅण्डिंगची नामी संधी असून नाशिकच्या उद्योजकांनी या समिटमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन मध्यप्रदेश औद्योगिक विकास महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केले.
मध्यप्रदेश औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य महाव्यवस्थापक आर.पी.चक्रवर्ती,महाव्यवस्थापक एस.एस. संधू,कार्यकारी अभियंता आय.जे.शुक्ला तसेच रॉबर्ट डिसुझा आदी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी भोपाळ समिटच्या प्रचाराच्या निमित्ताने निमा हाऊस येथे भेट देऊन निमा अध्यक्ष आशिष नहार,आयमा अध्यक्ष ललित बूब यांच्यासह विविध औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली व भोपाळ समिटची विस्तृत माहिती त्यांना दिली. जागतिक दर्जाच्या अनेक कंपन्या भोपाळ समिटमध्ये सहभागी होणार असल्याने नाशिकसह महाराष्ट्रातील उद्योजकांना त्यांच्या ब्रँडिंगची नामी संधी असून त्याचा त्यांनी लाभ घ्यावा,असे आवाहनही मध्यप्रदेश औद्योगिक विकास महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चेच्या वेळी केले.गुंतवणुकी संदर्भात नाशिकच्या उद्योजकांबरोबर परस्पर सहकार्य करण्याची तयारीही त्यांनी दर्शविली. मध्यप्रदेश सरकारच्या विनंतीचा आदर बाळगून भोपाळ समिटमध्ये नाशिकचे उद्योजक मोठ्या प्रमाणात सहभागी होतील, असे आश्वासन निमा अध्यक्ष आशिष नहार यांनी यावेळी दिले.नाशिकच्या औद्योगिक विकासाचा आढावा ललित बूब यांनी यावेळी सादर केला.
चर्चेत चेंबरचे माजी अध्यक्ष संतोष मंडलेचा, किशोर राठी,राजेंद्र अहिरे,आयमाचे उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे, राजाराम सांगळे, सचिन कंकरेज, रवी महादेवकर, गोविंद झा, सचिन कंकरेज, समीर पटवा ,किरण पाटील , मिलिंद राजपूत आदी उपस्थित होते.