नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशकात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी येथे मेगा प्रकल्प त्वरित उभारावेत तसेच ड्रायपोर्ट,कायमस्वरूपी प्रदर्शन केंद्र, आयटी प्रकल्पांच्या कामासही गती द्यावी,अशी मागणी नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) चे अध्यक्ष आशिष नहार यांनी विकास आयुक्त(उद्योग) दीपेंद्रसिंह कुशवाह यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
नाशिक शहराच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासासाठी जास्तीत जास्त रोजगाराची संधी उपलब्ध करून देणाऱ्या किमान दोन महत्वाकांक्षी मेगा प्रकल्पांची आवश्यकता असून त्यादृष्टीने तातडीने पावले उचलण्याची गरज आहे. गेल्या सहा दशकापासून नासिकची औद्योगिक वाटचाल सुरू झाली असून अल्पावधीत अनेक जागतिक दर्जाच्या उद्योग समूह इथे प्रस्थापित झाला. मात्र मध्यंतरीच्या काळात सदर उद्योग विस्तार थांबला आहे. विविध सेवा उद्योग व निर्मात्या उद्योगांची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढली असताना त्यांना प्रोत्साहन व शहराची आर्थिक उलाढाल व बेरोजगारी टाळण्यासाठी नवीन उद्योग येणे गरजेचे आहे असे आशिष नहार यांनी नमूद केले. तसेच नाशिकमध्ये औद्योगिक प्रदर्शन भरवण्यासाठी कायमस्वरूपी जागा नसल्याने त्यासाठी ऐनवेळी मोठ्या प्रमाणात धावपळ करावी लागते. त्यामुळे दमछाक तर होतेच परंतु वेळ व तात्पुरती उभारणीत पैसा देखील वाया जातो. हे सर्व टाळण्यासाठी दिल्लीच्या प्रगती मैदान धर्तीवर नाशकातही आंतरराष्ट्रीय दर्जाचे कायमस्वरूपी औद्योगिक प्रदर्शन केंद्र असणे गरजेचे असून त्यासाठी केंद्रीय खादी ग्रामोद्योग विभागाच्या जागेचा प्राधान्याने विचार व्हावा असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
नाशकातील उद्योजक आणि शेतकरी यांची उत्पादने व वाहतुकीच्यादृष्टीने वरदान ठरणाऱ्या,रोजगार निर्मितीस प्रोत्साहन देणाऱ्या व निफाड तालुक्यात साकारत असलेल्या ड्रायपोर्ट प्रकल्पाच्या कामास अधिक गती देऊन ते काम लवकर पूर्ण करणे अत्यंत गरजेचे आहे. नाशकात अभियांत्रिकी तसेच बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशनची अनेक महाविद्यालये आहेत. दरवर्षी शेकडो विद्यार्थी त्यातून पदव्या घेऊन बाहेर पडतात.परंतु नाशकात आयटीचे जाळे नसल्याने त्यांना रोजगारासाठी पुणे,बंगलुरु किंवा अन्यठिकाणी धाव घ्यावी लागते. नाशकात आयटी प्रकल्प आल्यास या विद्यार्थ्यांना अन्यत्र जाण्याची गरज भासणार नाही. तरी आमच्या विनंतीचा विचार करून नाशकात आयटी पार्क होणे ही काळाची गरज आहे आणि शासनाने त्याकडे जातीने लक्ष द्यावे,असे साकडेही नहार यांनी कुशवाह यांना घातले आहे.
अंबड व सातपूर औद्योगिक क्षेत्रातील सांडपाणी व्यवस्थापन व भुयारी गटार योजना या अमृत-२ योजनेत समाविष्ट करून हे दोन्ही प्रकल्प युद्धपातळीवर पूर्ण करण्यासाठी तातडीने पावले उचलावीत. सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतीतील उद्योजक आणि व्यापाऱ्यांसाठीची एलबीटी कर निर्धारणाची समस्या त्वरित मार्गी लावण्याची गरज आहे. अंबड औद्योगिक क्षेत्रातील फायर स्टेशनच्या हस्तांतरणाची प्रक्रिया लवकर पूर्ण करावी. परिसरातील औद्योगिक सुरक्षेच्या दृष्टीने ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे. अंबड व सातपूर औद्योगिक क्षेत्रातील मूलभूत सुविधांच्या दृष्टीने वार्षिक अर्थसंकल्पात स्वतंत्र निधीची तरतूद करणे काळाची गरज असून त्यादृष्टीने ठोस पावले उचलण्यात यावीत. नाशकातील शिलापूर येथे साकारत असलेल्या इलेक्ट्रिकल टेस्टिंग लॅबच्या कामाचा अधिक गती देऊन ही लॅब तातडीने सुरू करणे गरजेचे आहे, असेही निवेदनात पुढे म्हटले आहे.
नाशिक शहराच्या विस्ताराच्यादृष्टीने तसेच उद्योजकांच्या मालाची ने-आण सुलभ व सुरळीत व्हावी यासाठी नाशकात नवीन रिंग रोड तयार करणे गरजेचे आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळा लक्षात घेऊन कुंभमेळ्याच्या अंदाजपत्रकात यासाठी निधीची तरतूद केल्यास ते उत्तम राहील आणि त्यादृष्टीने पावले उचलावीत. नाशिकचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या निओ मेट्रो प्रकल्पाच्या कामास तातडीने गती देणे गरजेचे आहे. तसेच सिन्नर औद्योगिक वसाहतीतील सर्व्हिसरोड,ट्रक टर्मिनस, घनकचरा व्यवस्थापन,फायर स्टेशन,वीज पुरवठा व अन्य मूलभूत सुविधांच्या प्रश्नांकडे जातीने लक्ष द्यावे, अशी विनंतीही नहार यांनी निवेदनात शेवटी केली आहे.
विकास आयुक्त (उद्योग) दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी नाशिकला लवकरच मोठी उद्योग समूहाची गुंतवणूक देण्याची कबुली दिली. विविध प्रश्नांसाठी नाशिक तथा मुंबईत स्वतंत्र बैठक घेऊन सर्व प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले व शासनाच्या नवीन धोरणांबाबतीत देखील सर्विस्तर चर्चा केली.
सदर बैठकीला किशोर राठी, राजेंद्र अहिरे, मनीष रावल, राजेंद्र वडनेरे आदी निमाचे पदाधिकारी उपस्थित होते.