नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– त्रंबक रोडवरील ठक्कर इस्टेट येथे आयोजित निमा इंडेक्स २०२४ ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.रात्री तर कडाक्याची थंडी असतांनाही प्रदर्शन बघण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. रविवारी गर्दीचा उच्चांक झाला. एक लाखाच्या पुढे हा आकडा गेल्याने आयोजकांच्या चेहऱ्यांवर आनंद ओसंडून वाहत असल्याचे चित्र दिसले.
नामांकित कंपन्यांच्या अधिकारी व त्यांच्या प्रतिनिधींनी B2B अंतर्गत सर्व स्टॉल्सना भेटी देऊन उद्योजकांच्या उत्पादनांची माहिती जाणून घेऊन त्यांच्या मालास उठाव कसा मिळेल याबाबतची रणनिती त्यांना सांगितली आणि आवश्यकता भासल्यास त्यांची उत्पादने खरेदी करण्याचे दिलेले अभिवचन हे या प्रदर्शनाचे खरे फलित म्हणावे लागेल. विशेष म्हणजे विविध शाळा आणि महाविद्यालयांचे विद्यार्थी गटागटाने आल्याचे चित्र जाणवले.पदाधिकाऱ्यांना वाटून दिलेल्या कामाचे उत्कृष्ट वाटप झाल्याने आणि प्रत्येकाने मानापमामास फाटा देऊन आपापली जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पडल्याने प्रदर्शन यशस्वी होण्यास खूपच मदत होत आहे. ५२५ उद्योजकांनी आपापले स्टॉल्स लावल्याने त्यांचे मानावे तितके आभार थोडे आहे,असे निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी सांगितले.
नाशिकच्या औद्योगिक विकासासाठी दबावगट हवा
कामगार नेते व उद्योजक यांच्या परिसंवादातील सूर
नाशिक- नाशकात कामगार संघटना आणि उद्योजक यांच्यात सौहार्दाचे वातावरण असून याद्वारे दोघांमिळून दबाव गट निर्माण करून नाशिकच्या औद्योगिक विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार निमा इंडेक्स 2024 मध्ये आयोजित कामगार नेत्यांकडून नाशिकच्या औद्योगिक विकासा बाबतची भूमिका या विषयांवरील परिसंवादात उमटला. यावेळी कामगार नेते व उद्योजकांनी एकमेकांना खास शैलीत कोपरखळ्या मारून सभागृहातील लोकांना लोटपोटही केले.
निमा अध्यक्ष धनंजय बेळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या चर्चासत्रात सिटू कामगार युनियनचे डॉ. डी.एल.कराड, श्रमिक कामगार सेनेचे सुनील बागुल,नाशिक कामगार युनियनचे अशोक मुर्तडक,भाजपा कामगार सेलचे कुणाल अजवाणी आणि कामगार विकास मंचचे नेते कैलास मोरे, भारतीय कामगार सेनेचे उत्तम खांडबाहले यांनी सहभाग घेतला.व्यासपीठावर निमाचे सचिव निखिल पांचाळ, उपाध्यक्ष आशिष नहार,राजेंद्र अहिरे, कोषाध्यक्ष राजेंद्र वडनेरे,मनिष रावल,निपमचे अध्यक्ष राजाराम कासार,राजेंद्र आचारी,आयमा अध्यक्ष ललित बूब,सरचिटणीस प्रमोद वाघ,राजेंद्र कोठावदे,कैलास पाटील,नितीन आव्हाड, सतीश कोठारी,एस.के.नायर,,ललित सुराणा, किरण वाजे, गोविंद बोरसे,हेमंत खोंड,दिलीप वाघ, गोविंद झा, नानासाहेब देवरे,रावसाहेब रकिबे, शर्वरी गोखले आदी होते.
धनंजय बेळे यांनी निमाची सूत्रे हाती घेतल्यानंतर निमा आणि कामगार नेत्यांमध्ये सौहार्दाचे वातावरण निर्माण झाले आहे,असे गौरवोद्गार सिटूचे नेते डॉ.डी.एल.कराड यांनी परिसंवादात काढले.आज मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र संकुचित होत चालले आहे. शेअर मार्केटकडे लोक मोठ्या प्रमाणात उड्या मारतात.मालक आणि कामगार नेते हे काही एकमेकांचे शत्रू नाहीत. कुठलाही छोट्यातला छोटा उद्योग नफ्यात चालावा अशीच आमची भूमिका असते. कामगार संघटना आणि उद्योजक यांच्यात वैरभाव नसले तरी तणाव असल्याचे मात्र डॉ.कराड यांनी कबूल केले. या दोघांमध्ये सलोखा आणि विश्वास असेल तर गुंतवणूक वाढते उद्योगाचा विस्तारही होतो. नाशकात भूखंडाचे व विजेचे दर जास्त आहेत. विदर्भाला जी सवलत दिली जाते ती नाशिकला का नाही असा सवाल करून चेन्नई आणि कर्नाटकच्या धर्तीवर नाशिकला सुरुवातीच्या गुंतवणुकीसाठी रेड कार्पेट टाकण्याचे धोरण शासनाने आखले पाहिजे,असे डॉ.कराड पुढे म्हणाले. कायदा व सुव्यवस्था स्थिती, ठेकेदारी पद्धत या मुद्द्यांनाही त्यांनी स्पर्श केला.कामगार ही देशाची संपत्ती असून त्यांना आदराची वागणूक दिली पाहिजे. राज्यातील 35 टक्के उद्योग पुण्यात आहेत.नंतर नागपूरला मोठ्या प्रमाणात उद्योग जात आहेत याचे कारण काय हे सर्वांना ठाऊक आहे,असे त्यांनी नमूद केले .विदर्भाला झुकते माप मग नाशिकने काय घोडे मारले. नाशिकचे राजकीय नेतृत्व कमी पडते का असा सवाल करून नाशिकला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वांनी राजकीय जोडे बाजूला ठेवून रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवावी असा सल्लाही त्यांनी दिला.
आजचा दिवस उद्योगासाठी आणि कामगारांसाठी वैभवशाली आहे, आमची संघटना कामगारांचे हीत जोपासण्यावर विशेष भर देते. निवृत्तीनंतरही कामगारांना पोषक वातावरण निर्माण करून त्यांचे जीवन सुखावह कसे होईल यादृष्टीने पावले उचलण्याची गरज आहे,असे प्रतिपादन कामगार नेते आणि माजी महापौर डॉ. अशोक मुर्तडक यांनी केले.नाशिकचे उद्योग बाहेर जाणार नाही यासाठी प्रयत्न करावेत. नाशकातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यावर मी महापौर असताना भर दिला होता. स्वच्छ सुंदर आणि हरित नाशिक ही काळाची गरज आहे आणि त्यामुळे उद्योगांसाठी पोषक वातावरण निश्चितच निर्माण करता येते असेही मुर्तडक पुढे म्हणाले.
औद्योगिक विकासासाठी कामगार नेते आणि उद्योजक यांच्यात सुदृढ वातावरण आणि पारदर्शकता हवी.एच.आर.हा कोणत्याही कंपनीचा खरा आत्मा असतो. प्रत्येक कंपनीत युनियन ही काळाची गरज आहे. युनियन नसेल तर त्या कंपनीत समस्या निर्माण होतात. आऊटसोर्सिंग 100 टक्के असेल तर त्यात किमान 30 टक्के लोकांना कायम करावे, अशी सूचना कामगार नेते उत्तमराव खांडबहाले यांनी केली. कामगाराला संपत्ती मानून नाशकात चांगले प्रकल्प आणण्याची गरज आहे. जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीत मोठ्या प्रमाणात सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात,असेही त्यांनी पुढे नमूद केले.
कामगार विकास मंचचे कैलास मोरे यांनीही परिसंवादात भाग घेतला. कंपनीचे एचआर.आणि सल्लागार कंपनीत कायम तणाव कसा राहील यासाठी प्रयत्न करतात असा गंभीर आरोप त्यांनी केला.कामगार नेत्यांची आंदोलक अशी जी प्रतिमा निर्माण झाली ती पुसण्याची गरज आहे.बड्या कंपन्या वेंडर्सना तोडून देतात त्यामुळे ते किमान वेतन देऊ शकत नाही ची आठवणही मोरे यांनी करून दिली.नाशिकला जास्त गुंतवणूक आणण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू,असे भाजपा कामगार सेलचे कुणाल अजवानी यांनी सांगितले.
श्रमिक कामगार सेनेचे सर्वेसर्वा आणि शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते सुनील बागुल यांनी आपल्या भाषणात चौकार आणि षटकारांची आतषबाजी करून सभागृहाला लोटपोट केले.एक काळ असा होता की कराडांची युनियन लागली मालकांना झोप येत नसे असे त्यांनी सांगताच खसखस पिकली होती. परंतु आता काळ बदलला आहे.पूर्वी मालकांना युनियन मदत व मार्गदर्शन करत होती. परंतु आता मालक युनियन तोडतात,असा आरोप बागुल यांनी केला. कामगारांच्या बाजूने कायदे कमी आहेत. मालक आणि कामगार नेते यांनी एकमेकांना समजून काम केले पाहिजे असा सल्लाही त्यांनी दिला. नाशिकच्या औद्योगिक विकासासाठी भक्कम नेतृत्व निर्माण करा. आम्ही सर्व सतत निमाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, असेही बागुल यांनी नमूद केले.
प्रारंभी प्रास्ताविक करताना कार्यक्रमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी उद्योजक आणि कामगार यांच्या हितासाठी निमा तसेच विविध औद्योगिक संघटनांनी उचललेल्या विविध पावलांची माहिती दिली. नाशिकच्या औद्योगिक विकासासाठी उद्योजक आणि कामगार संघटना यांनी हातात हात घालून काम करण्याची गरजही प्रतिपादन केली.नाशिकमध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक यावी यासाठी शासनाकडे गाऱ्हाणे मांडण्यास भक्कम दबाव गट निर्माण करण्याची गरजही बेळे यांनी प्रतिपादन केली. जेथे कॉन्ट्रॅक्टचा मुद्दा आणि त्यामुळे जेथे तणाव आहे तिथे हा प्रश्न त्रिस्तरीय समितीने सोडविला पाहिजे, असेही बेळे यांनी पुढे सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निखिल पांचाळ यांनी केले. मोठया संख्येने उद्योजक प्रतिनिधी आणि कामगार संघटना प्रतिनिधी उपस्थित होते.