नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यातील उद्योजकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यास पालकमंत्रयांच्या सूचनेनुसार महापालिका, पोलीस, महसूल, एमआयडीसी, कामगार उपायुक्त, माथाडी मंडळ, महावितरण, प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच संबंधित सर्व यंत्रणांच्या अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक बुधवार १ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.३० वाजता निमा हाऊस, सातपूर,येथे आयोजित करण्यात आली आहे,अशी माहिती निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी दिली
निमाच्या नूतन विश्वस्त मंडळांने सूत्रे हाती घेतल्यानंतर ही पहिलीच महत्त्वाची बैठक असल्याने सर्वांचेच त्याकडे लक्ष लागले आहे. गेल्या काही वर्षांपासून उद्योजकाचे दुहेरी फायर सेस,एसटीपी,एमआयडीसीसाठी नवीन जागांचे भूसंपादन,अंबड एमआयडीसीसाठी स्वतंत्र पोलिस ठाणे, मूलभूत सुविधा, कामगार संघटना विषयी प्रश्न,आदींसह अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.त्याचा तातडीने निपटारा व्हावा या उद्देशाने या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
बैठकीस महापालिका आयुक्त चंद्रकांत पुलकंडवार, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच उद्योगांशी संबंधित सर्व यंत्रणांच्या प्रमुखांना पाचरण करण्यात आले आहे. उद्योजकांनी आपल्या समस्या मांडण्यासाठी तसेच सोडवणूक करून घेण्यास बैठकीस आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहनही बेळे व निमा पदाधिकाऱ्यांनी केले आहे.