नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या व निमाच्या प्रयत्नांना बळकटी देणाऱ्या मोठ्या उद्योजकांना आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा पुरवल्या जातील आणि त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आमची दारे नेहमी खुली राहतील,असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी मोठ्या उद्योगांच्या प्रतिनिधींसमोर केले.
निमा कार्यालयात जिल्ह्यातील मोठ्या उद्योगांच्या प्रतिनिधींसमवेत प्रथमच स्वतंत्र संवाद सत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी बोलत होते. व्यासपीठावर निमाचे अध्यक्ष आशिष नहार, जिल्हा पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी दीपक पाटील, कार्यकारी अभियंता जयवंत पवार, जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, आयमाचे अध्यक्ष ललित बुब,निमाचे उपाध्यक्ष मनीष रावल,किशोर राठी, सचिव राजेंद्र अहिरे, कोषाध्यक्ष राजेंद्र वडनेरे, सहा सचिव तथा मोठे उद्योग समन्वयक समिती अध्यक्ष किरण पाटील उपस्थित होते.
मोठ्या उद्योग समूहाचे एबीबी कंपनीचे अजय गोसावी, सीजी पॉवरचे अजय कहाणे, ज्योती स्ट्रक्चरचे जगदीश पाटील व विक्रम पांडव, बिल केअर लिमिटेडचे अंकुश शितोळे, ब्ल्यू क्रॉस लिमिटेड चे कृष्णा चव्हाण, ग्लेनमार्क फार्मास्युटिकल लिमिटेड कडून ब्रिजेश जाधव, ग्राफाईट इंडिया लिमिटेडचे समीर कुलकर्णी, सॅम्सोनाइट लिमिटेडचे पंकज चावला, आनंद आय पॉवर कडून विजय निकुंभ तथा सुजित त्रिपाठी , दालमिया भारत लिमिटेडचे राजेंद्र जगनानी, आयएमपीएस लिमिटेडचे श्रीकांत पाटील, इमर्सन लिमिटेडचे शिरीष चाफेकर, शारदा मोटर्स लिमिटेड कडून मनोरंजन पात्रा , हेल्डेक्स इंडिया लिमिटेडचे प्रवीण वाणी तसेच लीग्रँड, टीडीके, केपरिहांस आदी मोठ्या कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
उद्योग क्षेत्र हा राज्याच्या विकासाचा कणा आहे. मोठ्या उद्योगांमुळे शेकडो लघु व मध्यम उद्योगांना चालना मिळते. शासनाला सर्वाधिक महसूल या क्षेत्राकडूनच मिळतो. अनेकांना सक्षम रोजगार या उद्योगांमुळे मिळत असतो. त्यामुळे या क्षेत्राकडे आमचे प्राधान्याने लक्ष असते. मोठ्या उद्योगांना विविध परवानग्या मिळविण्यासाठी एक खिडकी योजना उघडून उद्योजकांचे काम विनात्रास कसे होईल यादृष्टीने जिल्हा प्रशासनातर्फे भक्कम यंत्रणा उभी करण्याचा मानसही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी बोलून दाखवला. आपल्या उद्योगांचा विस्तार देखील नाशिक परिक्षेत्रात करावा असे आवाहन निमा अध्यक्ष आशिष नहार यांनी केले व त्या साठी निमा , शासन व मोठ्या उद्योगांचे अधिकारी यात सुसंवाद घडवून आणण्याची भूमिका मांडेल अशी ग्वाही नहार यांनी दिली. अनेक विदेशी मोठ्या गुंतवणूकदार उद्योगांना शासनाच्या काही भूमिकांना विरोध करता येत नाही त्यामुळे समन्वयासाठी निमाच्या व्यासपीठाची मदत होणार असल्याचे मोठ्या उद्योगांच्या प्रतिनिधींनी नमूद केले. औद्योगिक सुरक्षा, तांत्रिक सहकार्य व सीएसआर च्या माध्यमातून शहराच्या विकासासाठी हातभार लावत असल्याची सविस्तर माहिती उपस्थितांनी दिली. उद्योग क्षेत्राच्या विकासाच्यादृष्टीने नाशकात अत्यंत पोषक वातावरण असल्याचे उद्योजकांनी सांगितले.
मोठ्या उद्योग क्षेत्रातील उद्योजकांच्या समस्या जिल्हाधिकाऱ्यांनी जाणून घेतल्या त्यात जिल्ह्यात साकारणाऱ्या डायपोर्ट उभारणीस गती, औद्योगिक क्षेत्रातील रस्ते व स्वच्छता, सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी यंत्रणा , कुशल कामगार घडविण्याची गरज, विनाखंड वीज पुरवठा आदी विषयांवरती सखोल चर्चा झाली. नाशिक शहराला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी वाढविणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे उपस्थितांनी सांगितले. वाढवण बंदराचा मार्ग नाशिक वरून असला तरी विमान सेवा देखील विस्तारित करण्याची गरज आहे.
उद्योजकांना आखंड वीज पुरवठा व्हावा यासाठी ४०० केव्ही क्षमतेचे वीज उपकेंद्र व सीईटीपीचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे असे आशिष नहार यांनी सांगितले. कुशल कामगारांच्या पुरवठ्यासाठी टाटा समूहासमवेत निमाचा सामंजस्य करार झाला असून लवकरच स्किल डेव्हलपमेंट सेंटर सुरू होणार आहे. उद्योजकांनी कुशल कामगारांची मागणी नोंदवावी. ते उपलब्ध करून देण्याचा आम्ही निश्चितच प्रयत्न करू असे नहार यांनी सांगितले.
मोठ्या उद्योजकांनी उपस्थित केलेल्या विविध शंकांचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी निरसन केले. ग्लेनमार्कचे किरण पाटील यांनी सूत्र संचालन तथा निमाचे सचिव राजेंद्र अहिरे यांनी आभार व्यक्त केले. या बैठकीत नितीन वागस्कर, अखिल राठी, कैलास पाटील, नितीन आव्हाड, किरण जैन, वैभव जोशी, रवींद्र झोपे, संजय महाजन, प्रवीण वाबळे आदी उद्योजक उपस्थित होते.