नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- तपोवनातील आरक्षित जागेत कायमस्वरूपी प्रदर्शन केंद्र उभारण्याच्या हालचालींना आता वेग आला आहे. बुधवारी त्यादृष्टीने महापालिका आयुक्त मनिषा खत्री यांनी नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन(निमा)चे अध्यक्ष आशिष नहार व पदाधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष जागेची पाहणी करून हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे आदेश दिले.
नाशकात उत्पादित होणाऱ्या वस्तूंसाठी जागतिक बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी निमातर्फे गेल्या अनेक वर्षांपासून उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे औद्योगिक प्रदर्शन भरविले जाते. मात्र शहरात कायमस्वरूपी प्रदर्शन केंद्र नसल्याने डोम उभारणे, संपूर्ण इलेक्ट्रिफिकेशन, स्टॉल उभारणी यासह शासकीय परवानग्या यावर आयोजकांचा मोठा खर्च होतो.त्यामुळेच नाशकात कायमस्वरूपी प्रदर्शन केंद्र उभारावे यासाठी निमाने सातत्याने पाठपुरावा करून तपोवनातील जागा त्यासाठी सुचवली असून जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनीही गेल्या आठवड्यात सदर प्रस्तावासाठी विशेष निधी प्राप्त करून देण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे,याची आठवण निमाचे अध्यक्ष आशिष नहार यांनी मनिषा खत्री यांना करून दिली. निमाने तपोवन येथील जागेवर कायमस्वरूपी प्रदर्शन केंद्र उभारण्याचा प्रस्ताव मांडला.आयुक्तांनी त्वरित प्राथमिक मान्यता दिली. कुंभमेळा काळ वगळता इतर 11.5 वर्षांसाठी हे केंद्र सुरू ठेवता येईल. निमाने यासाठी लवकरच अभ्यासपूर्ण आराखडा सादर करावा असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.
नाशिक महापालिकेचे शहर अभियंता संजीव अग्रवाल,निमाचे सचिव राजेंद्र अहिरे, उपाध्यक्ष मनिष रावल,सचिन कंकरेज, किरण खाबिया,कैलास पाटील,नितीन आव्हाड,सतीश कोठारी, मिलिंद राजपूत तसेच मनपाचे अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते.
नाशकात कायमस्वरूपी प्रदर्शन केंद्र नसल्याने सध्या उपलब्ध होईल त्या जागेवर प्रदर्शन भरवण्याची वेळ आयोजकांवर येते. औद्योगिक व व्यापारी प्रदर्शनाला भेट देण्यासाठी उत्तर महाराष्ट्रासह राज्य तसेच देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक येत असतात.त्यांच्या सुरक्षतेची व्यवस्थाही करणेही कठीण होते. दिल्ली, मुंबई,बंगंळुरु,अहमदाबाद,हैदराबाद आदी शहरांमध्ये भव्य असे कायमस्वरूपी प्रदर्शन केंद्र साकारले आहे. त्याच धर्तीवर नाशकात कायमस्वरूपी प्रदर्शन केंद्र तपोवनाच्या जागेवर अस्तित्वात आल्यास हे नाशिक शहर पासून जवळ असून व नाशिकचे ब्रँडिंग करणे शक्य होईल आणि विविध क्षेत्रात नाशिकचे नाव जागतिक नकाशावर चमकेल,असेही नहार यांनी निवेदनात नमूद केले आहे. दरम्यान कायमस्वरूपी प्रदर्शनासाठी लागणारी जागा तसेच त्याच्या निधी बाबतचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात येणार आहे. नाशिककरांचे स्वप्न लवकरच साकार व्हावे या दृष्टीने आपले प्रयत्न असल्याचे आयुक्त मनीषा खत्री यांनी निमाच्या शिष्टमंडळास सांगितले.