नाशिक: उद्योगाच्या विकासासाठी नेहमी कार्यरत असणा-या आयमाचे इंडेक्स २०२२ हे प्रदर्शन उत्साहात पार पडले. उद्योजकांचा खूप चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद या प्रदर्शनाला मिळाला. ३०० पेक्षा जास्त स्टॉल्स या प्रदर्शनात होते. या प्रदर्शनात चार महत्त्वाचे करार करण्यात आले. आणि एकूण ४००० रुपयांची गुंतवणूक नाशिकमध्ये झाली. इंजिनिअरिंग आणि लूब्रिकेट्स या क्षेत्रात हे करार झाले. या प्रोजेक्ट्सचा पाठपुरावा चालू आहे. पुढच्या एक दोन वर्षात हे प्रोजेक्ट सुरू होण्याची शक्यता आहे, असे मत आयमाचे अध्यक्ष निखिल पांचाळ यांनी व्यक्त केले.
इंडिया दर्पण फेसबुक लाइव्हमध्ये ते बोलत होते. बागेश्री पारनेरकर हिने मुलाखत घेतली. स्थानिक रोजगाराच्या संधीविषयी बोलताना ते म्हणाले की, साहजिकच नाशिकमध्ये काही तयार करण्यासाठी प्रत्येक सेक्टरचा पाठिंबा, मदत आवश्यक आहे. मोठ्या प्रमाणावर इन्फ्रास्ट्रक्चरची गरज लागेल, सर्व्हिस सेक्टरची मदत लागेल, त्यामुळे रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतील. आणि चांगल्या प्रकारे रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या तर नाशिकमधील जे टॅलेंट बाहेर जाते ते आपोआप नाशिकमध्ये राहील.
नवउद्योजकांच्या समस्यांविषयी आणि त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, सध्या आयमा सोबत एमआयडीसीने पुढाकार घेतला आहे, सरकारी योजना चांगल्या आहेत. जागा चांगली उपलब्ध आहे. स्टार्टअपची संधी चांगली आहे जी आधी नव्हती. कोणताही नवीन उद्योग सुरू करताना उत्साह, भांडवल, इन्फ्रास्ट्रक्चरची गरज आणि सरकारी योजना या चार गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे, त्यांचा मार्केटनुसार अभ्यास केला पाहिजे. तसेच आज असे अनेक उद्योग आहेत की ते पुढे नेण्यासाठी दुसरी पिढी नाही तर अशा उद्योगाकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे. उद्योग सुरू करताना सेक्टर कोणतं निवडतो हे पण तितकंच महत्त्वाचे आहे. आज प्रत्येक क्षेत्रात संधी आहेत त्या ओळखणं गरजेचं आहे.
अंबड, सातपूर आणि सिन्नर मध्ये जागा शिल्लक नसल्याने आता औद्योगिक वसाहती साठी नाशिक ते घोटी दरम्यान शोध सुरू आहे. त्याविषयी ते म्हणाले की, नाशिक हे सुवर्ण त्रिकोणातील म्हणजे मुंबई, पुण्यानंतर आता उद्योगासाठी नाशिकचा विचार केला जातो. आता प्रत्येक जण आपला माल जगभरात कसा जाईल याचा विचार करतो. मुंबई जवळ असल्याने बंदर जवळ आहे. त्यामुळे नाशिक घोटी हा मार्ग सगळ्याच दृष्टीने सोयीचा आणि फायदेशीर ठरेल, असे त्यांनी सांगितले. सरकारी योजनांविषयी ते म्हणाले की, योजना चांगल्या आहेत पण त्यांची अंमलबजावणी योग्य वेळी आणि योग्य प्रकारे व्हायला हवी. कधी कधी एखादी योजना किंवा धोरण तयार होऊन अमलात येईपर्यंत काही काळ लोटलेला असतो. आणि तोपर्यंत मार्केट मध्ये बदल होतो. आणि त्यामुळे योजना चांगली असूनही त्याचा फायदा मिळत नाही. तर सरकारी धोरणात गतिशीलता आणि लवचिकता असणे आवश्यक आहे.
आगामी योजनांबद्दल ते म्हणाले की, बऱ्याच वर्षांपासून आपण म्हणत आहोत की नाशिकमध्ये चांगल्या इंडस्ट्री आल्या पाहिजे. पण त्या येत नसतील तर आपण त्यांच्यापर्यंत जावं हा या वर्षीच्या कामाचा प्रमुख अजेंडा आहे. त्यासाठी एक्स्पोर्ट मॅनेजर्स प्रोग्रॅम आयमा तर्फे आम्ही घेणार आहोत. यात बाजारपेठांचा अभ्यास करून कोणत्या देशात कोणत्या मालाला मागणी आहे, त्याप्रमाणे त्याच कॉस्टिंग, ब्रँडिंग, पॅकिंग, हे कसं असावं हे सांगितलं जाईल आणि याचा लघु उद्योगांना नक्कीच फायदा होईल. आज नाशिकमध्ये ३% लोक एक्स्पोर्ट करतात जर प्रत्येक लघु उद्योजक एक्स्पोर्ट करायला लागला तर हा आकडा नक्कीच वाढेल, असे आशादायी मत त्यांनी व्यक्त केले.