इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – तुम्ही स्मार्टफोन्स, स्मार्टवॉच आणि स्मार्ट गॅजेट्सचा भरपूर वापर केला असेल, पण तुम्हाला कोणत्याही स्मार्ट शूबद्दल माहित आहे का असे विचारले तर तुमचे उत्तर कदाचित नाही असेच असेल. Nike या शू ब्रँडने स्मार्ट शूज लाँच केले आहेत. हा Nike शू स्मार्ट आणि पूर्णपणे स्वयंचलित आहे. अगदी या शूजची लेसदेखील रोबोटप्रमाणे बांधली जाते. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे यात ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी देखील आहे.
या Nike शूचे नाव आहे Adapt BB. दिसण्याच्या बाबतीत, ते बास्केटबॉल शूसारखे आहे. या बुटाचे वैशिष्ट्य म्हणजे ते परिधान केल्यावर आपोआप लेसेस बांधतात. जर तुम्ही बास्केटबॉल खेळाडू असाल तर ही तुमच्यासाठी भेटवस्तूपेक्षा कमी नाही.
Nike Adapt BB मध्ये रक्तदाब तपासण्याचीदेखील सोय उपलब्ध आहे. त्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते परिधान करताना तुम्ही चालत असाल आणि तुमचे पाय सुजले तर हा शू तुमच्या रक्तदाबाची माहितीही तुम्हाला देईल. हा बूट घट्ट झाला तर आपोआप सैल होण्याची सुविधादेखील यात उपलब्ध करुन देण्यात आली आहे. अॅपच्या माध्यमातून या शूला पूर्णपणे नियंत्रित करता येऊ शकतं. याआधी Nike ने Nike + iPod आणि Nike + Training सारखे स्मार्ट शूज सादर केले आहेत जे लोकांनाही आवडले आहेत.
Nike Adapt BB भारतात लॉन्च करण्याबाबत मात्र कंपनीने काहीही माहिती दिलेली नाही. भारतीय लोकांमध्ये या शूजविषयी उत्सुकता असून, लवकरात लवकर भारतात हा लाँच व्हावा अशी मागणी केली जात आहे. लोकांची उत्सुकता पाहता भारतात या शूला चांगला प्रतिसाद मिळेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.