नवी दिल्ली – स्वप्न बघणे आणि ते पूर्ण करण्यासाठी जिद्द बाळगणे यात खूप अंतर आहे. ज्यांच्या स्वप्नांना जिद्दीचे आणि संघर्षाचे बळ मिळते ते आपल्या कर्तृत्वाची छापही ठसठशीत उमटवतात. केरळ येथील २८ वर्षांच्या रंजीत रामचंद्रन या तरुणाचा असाच अफलातून प्रवास सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. त्याने नाईट गार्ड ते आयआयएम प्रोफेसरपर्यंतचा केलेला प्रवास वाखाणण्याजोगा आहे.
रंजीत रामचंद्रन याची निवड रांची येथील आयआयएम येथे प्रोफेसर म्हणून झाली आहे. त्यामुळे त्याच्या संघर्षाची कथा सोशल मिडीयावर चांगलीच व्हायरल होत आहे. दोन दिवसांपूर्वी रामचंद्रन याने केरळमधील आपल्या घराचे छायाचित्र सोशल मिडीयावर पोस्ट केले आणि त्यासोबत ‘आयआयएमच्या प्रोफेसरचा जन्म याच घरात झाला‘ असे कॅप्शन दिले. या पोस्टमध्ये प्लास्टिक आणि विटांनी बांधलेली एक छोटी झोपडी दिसत आहे. त्याने कॅप्शनमध्ये पुढे लिहीले आहे की, ‘हे एका झोपडीचे छायाचित्र आहे. या झोपडीवर एक तात्पूरते छत टाकले आहे. यावरून पावसाळ्यात घरात पाणी गळायचे.’
रामचंद्रन हा कासरगोड येथील पनाथूरमध्ये बीएसएनएलच्या कार्यालयात नाईट गार्ड होता. त्याने त्यापूर्वी अर्थशास्त्रातील पदवी प्राप्त केली होती. दिवसा अभ्यास आणि कॉलेज व रात्री टेलिफोन एक्स्चेंजमध्ये नोकरी करायचो, असे त्याने सांगितले आहे. रामचंद्रनने ही कहाणी फेसबुकवर टाकल्यानंतर मिडीयामध्ये तर बातम्या आल्याच. शिवाय त्याच्या पोस्टलाही ५० हजाराच्या जवळपास लाईक्स आणि कमेंट्स मिळाले आहेत. केरळचे अर्थमंत्री टीएम थॉमस यांनीही त्याचे अभिनंदन केले आहे.
रामचंद्रनला अपेक्षा नव्हती
मी संघर्ष केला आणि स्वप्न साकार करण्यासाठी धडपडलो. गेल्याच वर्षी पीएचडी पूर्ण केले. गेल्या दोन महिन्यांपासून बंगळुरू येथील क्राईस्ट विद्यापीठात सहयोगी प्रोफेसर होतो. पण माझ्या आयुष्यात आयआयएमच्या नियुक्तीची फेसबुक पोस्ट एवढी व्हायरल होईल, याची मी कल्पनाही केली नव्हती असे रामचंद्रन म्हणतो.